लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महाराष्ट्र अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक येथील कारागृहात १९९३ मुंबई बॉम्बस्फोटातील दोषी अबू सालेम याची भेट घेतल्याचा आरोप करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी विश्व हिंदू परिषदेने केली आहे. यासंदर्भात विहिंपच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले.
विश्व हिंदू परिषदेचे मंत्री अमोल ठाकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, संवेदनशील घटनात्मक पदावर असलेल्या व्यक्तीने गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची कारागृहात जाऊन भेट घेणे ही गंभीर बाब आहे. त्यामुळे प्यारे खान यांच्या या भेटीमागील कारणे, स्वरूप आणि पार्श्वभूमीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.
या संपूर्ण प्रकरणाची केंद्रीय अन्वेषण विभाग (सीबीआय) आणि राष्ट्रीय तपास संस्था (एनआइए) यांच्यामार्फत स्वतंत्र चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही विहिंपने केली आहे. या चौकशीतून वस्तुस्थिती स्पष्ट होऊन संबंधित प्रकरणातील सत्य समोर यावे, अशी अपेक्षा अमोल ठाकरे यांनी व्यक्त केली.
१९९३ मधील मुंबई बॉम्बस्फोट प्रकरणातील दोषी अबू सालेम सध्या कारागृहात आहे. अशा व्यक्तीची अल्पसंख्याक आयोगाच्या अध्यक्षांनी भेट घेतल्याचे समोर येत असेल, तर या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेणे आवश्यक असल्याचे विहिंपने म्हटले आहे. संवेदनशील घटनात्मक पदाची प्रतिष्ठा आणि विश्वासार्हता कायम ठेवण्यासाठी या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी भूमिका संघटनेने मांडली.
प्यारे खान यांना पदावरून हटवण्याची मागणीही विश्व हिंदू परिषदेने केली आहे. तसेच भेटीमागील नेमка उद्देश, कारागृह प्रशासनाची परवानगी आणि संबंधित परिस्थिती याची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे.














