लोकवाहिनी न्यूज
नागपूर : कुख्यात गुन्हेगार अबू सालेम याची कारागृहात भेट घेतल्याच्या आरोपांमुळे महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान चर्चेत आले आहेत. या आरोपांचे पुरावे सादर करण्यास एक कोटी रुपये देण्याचे आव्हान प्यारे खान यांनी दिले आहे.
प्यारे खान यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांमध्ये अबू सालेमसोबत झालेल्या कथित भेटीचा मुद्दा गंभीर मानला जात आहे. विशेषतः, अल्पसंख्याक आयोगासारख्या संवैधानिक संस्थेच्या महत्त्वाच्या पदावर असताना अशी भेट झाली असल्यास तिची पार्श्वभूमी, परवानगी आणि उद्देश काय होता, याची चौकशी होण्याची मागणी होऊ शकते.
अबू सालेम हा गंभीर गुन्ह्यांमध्ये दोषी ठरलेला कैदी आहे. त्यामुळे एखाद्या सार्वजनिक पदावरील व्यक्तीने त्याची कारागृहात भेट घेतली असल्याचा दावा खरा असल्यास, त्या भेटीची अधिकृत नोंद, भेटीची परवानगी आणि संबंधित कागदपत्रे यांना विशेष महत्त्व प्राप्त होते.
प्यारे खान यांचे सत्ताधारी भारतीय जनता पक्षातलील अनेक नेत्यांशी घनिष्ठ संबंध असले तरी, त्यांच्यावर झालेले आरोप गंभीर असून, यातून त्यांची सुटका होणे कठीण आहे. त्यांच्याकडे राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्षपद असून, या पदावर असताना ते कुख्यात अबू सालेमला कारागृहात जाऊन कसे भेटू शकतात, हा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या या भेटीमागचा उद्देश काय होता, ही भेट कोणी आणि कशासाठी घडवून आणली होती. कुठल्या असंवैधानिक कामासाठी तर ही भेट नव्हती, असा प्रश्नही उपस्थित होत आहे. प्यारे खान यांच्याकडून दिल्या गेलेल्या १ कोटी रुपयांच्या आव्हानाकडे पक्षातील ज्येष्ठ नेते कोणत्या दृष्टिकोनातून बघतात, ही बाब बघण्यासारखी राहणार आहे.













