इंधन बचत, रुपयाचे अवमूल्यन आणि वाढत्या खर्चावरून सरकारला प्रश्न
लोकवाहिनी न्यूज,पुणे : देशातील परिस्थिती गंभीर असल्यास सर्वपक्षीय बैठक बोलावली पाहिजे आणि त्या बैठकीला स्वतः पंतप्रधान उपस्थित राहिले पाहिजेत, असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत केलं. यापूर्वी अनेक बैठका झाल्या, मात्र त्यात पंतप्रधान नव्हते. देशाच्या अर्थव्यवस्थेवर काय परिणाम होऊ शकतो, हे थेट पंतप्रधानांनीच सर्व पक्षांना सांगणे गरजेचे असल्याचेही त्यांनी म्हटले. पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाची सर्वांनी गंभीरपणे दखल घ्यायला हवी. जागतिक तणावामुळे पेट्रोल-डिझेलचे दर वाढत असून परकीय चलनाचा ताण वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी इंधनाची बचत करावी, असे आवाहन पंतप्रधानांनी केले होते. याला शरद पवारांनी पाठिंबा दिला आहे. यावेळी त्यांनी काही मंत्र्यांच्या खर्चकपातीच्या घोषणांवरही प्रश्न उपस्थित केले. एका मंत्र्याने १७ गाड्यांचा ताफा ८ वर आणल्याचे सांगितले. पण मुळात १७ गाड्या का होत्या? असा सवाल त्यांनी केला. तसेच लोकांना काटकसरीचा सल्ला देताना नेत्यांनी स्वतःही सातत्याने साधेपणा दाखवायला हवा, असे त्यांनी स्पष्ट केले.
विरोधी पक्षनेत्याबद्दल आदर राखावा
विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या भाषेवरही पवारांनी नाराजी व्यक्त केली. राहुल गांधी हे लोकसभेतील घटनात्मक पदावर आहेत, त्यामुळे त्यांच्याविषयी अशा प्रकारे बोलणे योग्य नसल्याचे ते म्हणाले. रुपयाचे अवमूल्यन आणि इराणमधील संघर्षामुळे देशावर आर्थिक दबाव वाढत असल्याचेही पवारांनी सांगितले. मात्र त्यांनी सरकारलाच प्रश्न विचारला की, परिस्थिती इतकी गंभीर होती तर निवडणुकीपूर्वी जनतेला याची माहिती का देण्यात आली नाही? तसेच पंतप्रधान मोदी सोमनाथ मंदिर कार्यक्रमासाठी सहा विमानांसह गेले होते, याचाही त्यांनी उल्लेख करत खर्चकपातीच्या संदेशात सातत्य असणे आवश्यक असल्याचे म्हटले.








