परिवहन मंत्र्यांचा थेट इशारा; ३० जूनपर्यंतच शेवटची मुदत
लोकवाहिनी न्यूज,मुंबई : महाराष्ट्र राज्य शासनाने आता वाहनांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली असून, ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट’ (एचएसआरपी) बसवणे अनिवार्य करण्यात आले आहे. विशेषतः १ एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या जुन्या वाहनांसाठी हा नियम लागू करण्यात आला आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्पष्ट शब्दांत इशारा देत सांगितले आहे की, ३० जून २०२६ पर्यंत वाहनांवर एचएसआरपी प्लेट बसवली नाही, तर १ जुलैपासून थेट दंडात्मक कारवाई केली जाईल.
यापूर्वी शासनाने एचएसआरपी बसवण्यासाठी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंतची मुदत दिली होती. मात्र, अजूनही राज्यातील अनेक वाहनधारकांनी ही प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. काही ठिकाणी तांत्रिक अडचणी, तर काही ठिकाणी केंद्रांवरील गर्दीमुळे वाहनधारकांना गैरसोय होत असल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यामुळे शासनाने नागरिकांना आणखी एक संधी देत मुदत ३० जून २०२६ पर्यंत वाढवली आहे. मात्र, हीच अंतिम मुदत असल्याचे परिवहन विभागाने स्पष्ट केले आहे.








