दोषींवर कारवाई करू : प्रकाश आबिटकर
लोकवाहिनी न्यूज:हिंगोली : जिल्ह्यातील जवळा बाजार येथे एका गर्भवती महिलेबाबत अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. केवळ डिझेल नसल्याचे कारण देत रुग्णवाहिका नाकारण्यात आल्याने महिलेच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून आरोग्य व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित महिला प्रसूती वेदनेने तडफडत होती. तिच्या कुटुंबीयांनी तातडीने १०२ आणि १०८ या रुग्णवाहिका सेवांवर संपर्क साधला. मात्र रुग्णवाहिकेत डिझेल नसल्याचे सांगत सेवा देण्यास नकार देण्यात आल्याचा आरोप आहे. त्यामुळे महिलेला जवळपास अडीच तास उपचारासाठी प्रतीक्षा करावी लागली. वेळेत उपचार न मिळाल्याने तिच्या पोटातील बाळाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणावर राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते. त्यांनी सांगितले की, जर असा प्रकार घडला असेल तर त्याची सखोल चौकशी केली जाईल. केवळ डिझेल नसल्यामुळे रुग्णवाहिका मिळाली नाही, असे सरळ म्हणणे योग्य ठरणार नाही. प्रत्यक्ष परिस्थिती काय होती, याची तपासणी करून दोषींवर कारवाई केली जाईल. तसेच रुग्णवाहिकांच्या डिझेलसाठी शासनाकडून निधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आरोग्य व्यवस्थेतील सुविधा योग्य प्रकारे लोकांपर्यंत पोहोचल्या नाहीत, तर संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी म्हटले.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केला आहे. त्यांनी सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर निशाणा साधला. राज्यात डिझेलची टंचाई नसल्याचा दावा सरकारकडून केला जात असताना एका निष्पाप बाळाचा जीव गेला, अशी टीका त्यांनी केली.










