मनपाच्या सायकल मॅरेथॉनला उत्स्फूर्त प्रतिसाद
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : जागतिक सायकल दिनानिमित्त नागपूरमध्ये पर्यावरण आरोग्य संवर्धन व इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने आयोजित केलेल्या मॅरेथॉन सायकल स्पर्धेला नागपूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. आबालवृद्धांनी या स्पर्धेत सहभाग नोंदवून नागपूरच्या हरीत भविष्यासाठी कटिबद्ध असल्याचे संदेश आज दिला.
या स्पर्धेला महापौर नीता ठाकरे, उपमहापौर लिला हातीबेड, स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे, सत्ता पक्षनेते नरेंद्र (बाल्या) बोरकर, मनपा आयुक्त डॉ. विपिन इटनकर, जागतिक किर्तीचे प्रसिद्ध सायकलपटू अमित समर्थ, अतिरिक्त आयुक्त अंकित, अतिरिक्त आयुक्त मुरुगानंथम एम यांच्या उपस्थितीत सेंट उर्सुला शाळेच्या मैदानातून हिरवी झेंडी दाखवून या स्पर्धेची सुरुवात केली. महापौर ठाकरे यांनी फुगे हवेत सोडून शांततेचा संदेश दिला.
पर्यावरण संवर्धन पंधरवड्यानिमित्त शहरात ५ जून ते २१ जूनपर्यंत विविध कार्यक्रम राबविले जाणार आहे. याच साखळीत जागतिक सायकल दिनानिमित्त मनपाने ७ किलोमीटर अंतराची मॅरेथॉन सायकल स्पर्धा फिट इंडिया मुव्हमेंट, व्हाईस इंडिया, व इसाफ फाऊंडेशनच्या सहकार्याने आयोजित केली होती. या स्पर्धेत विविध संघटनांचे प्रतिनिधी सामील झाले होते. या नाग विदर्भ चेंबर ऑफ कॉमर्स, एनसीसी कॅडेट, ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सदस्य, कॉटन मार्केटमधील सुभाष मंडळाचे सदस्य तसेच शहरातील तरुण हौसी सायकलपटू मोठ्या संख्येने सामील झाले होते.
सिव्हिल लाइन येथील सेंट उर्सुला शाळांच्या मैदानात रविवारी सकाळपासून सायकलपटूंचा ताफा जमा होऊ लागला होता. उपायुक्त मंगेश खवले, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम व क्रीडा अधिकारी पियूष अंबुलकर ही स्पर्धा सुरळीत पार पडण्यासाठी नियोजन करीत होते. मनपा व फिट इंडियाचे लोगो असलेल्या टी शर्ट घालून सर्व सायकलपटू आपल्या सायकलने सकाळपासून सज्ज झाले होते. अनेकांनी हरीत नागपूरसाठी विविध प्रकारच्या वेशभूषा करून लक्ष आकर्षित करून घेतले होते.
या स्पर्धेला हिरवी दाखविण्यापूर्वी महापौर ठाकरे यांनी जागतिक सायकल दिनानिमित्त सर्व सायकलपटूंना शुभेच्छा दिल्या. तसेच हा दिवस आरोग्य संवर्धन पर्यावरण संरक्षण व इंधन बचत करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहन देणारा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुद्धा पश्चिम आशियामध्ये सुरु असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन बचतीसाठी आवाहन केले आहे. त्यानुषंगाने नागरिकांनी जास्तीत जास्त सायकलचा वापर करून इंधन बचतीसाठी सर्वांनी सहयोग द्यावा, असे आवाहन महापौरांनी केले. आयुक्तांनी सुद्धा पर्यायी इंधनावर चालणाऱ्या वाहनांचा जास्तीत जास्त वापर करावा असे आवाहन नागरिकांना केले.
झुंबा डान्सने वार्म अप
सायकल स्पर्धेला सुरुवात होण्यापूर्वी सायकलपटूंचे वार्मअप करण्यासाठी झुंबा क्लबच्यावतीने झुंबा नृत्याचे सेशन करण्यात आले. यात श्रीमती श्रद्धा ठाकूर व अपराजिता यांनी झुंबा डान्स करीत असताना डीजेच्या तालावर सायकलपटूंनी नृत्य केले. यात आबालवृद्धांपासून सर्वजण सामील झाले होते.
८५ वर्षांचा युवा सामील झुंबा डान्स करीत असताना कॉटन मार्केटमधील सुभाष मंडळाचे श्रीपाद बुरडे यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. या वयातही ते सायकल चालवित असून या स्पर्धेत भाग घेतला. एवढेच नव्हे तर त्यांनी मंचावर पुशअप करत युवकांना व्यायामाचे महत्व पटवून दिले. त्याचप्रमाणे केटीनगरचे रामभाऊ बोंदरे हे ७७ वर्षांचे व्यक्तीने सुद्धा या स्पर्धेत सहभाग नोंदवून तरुणाईला सकारात्मक संदेश दिला.
हरीत नागपूरसाठी संदेश
इंधन बचत व हरीत नागपूरचा संदेश देण्यासाठी श्रीमती सुजाता चतुर्वेदी यांच्या नेतृत्वात ४० जणांचा एक पथक हिरव्या रंगात व सायकलवर इंधन बचतीचा संदेश लिहिलेले फलक घेतलेले होते. फिट रहेगे हम, तभी विकसित होगा भारत, सायकल चलाए, इंधन बचाए, असे संदेश लिहिलेले फलक त्यांच्या सायकलवर हिरव्या फुलांनी सजविली होती. त्याचा हा गट सर्वांचे लक्ष वेधून घेत होता. यात विवेक निमजे, अरुण राय, भानुदास लेकुरवाळे, सुधाकर ठाकरे, श्रीपाद भुरळे, अभिषेक बोबडे, आरती पासलकर, यांचा समावेश होता.












