सीएसी ऑलराऊंडर्सच्या हिमालयीन मोहिमेला यश
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : सीएसी ऑलराऊंडर्स हिमालयीन कॅम्प २०२६ अंतर्गत आयोजित करण्यात आलेला भृगू लेक ट्रेक नागपूरच्या आठ साहसी युवक-युवतींनी यशस्वीरीत्या पूर्ण केला. हिमाचल प्रदेशातील निसर्गरम्य पर्वतरांगांमध्ये पार पडलेल्या या सुमारे १४,१०० फूट उंचीवरील मोहिमेत १६ ते १७ वयोगटातील श्रीरंग महाजन, पार्थ झवर, आरव मोहता, चिराग अग्रवाल, रचित बोराडे, परी सोहोनी, श्रेया सालफळे आणि आंचल लोहिया या युवक-युवतींचा सहभाग होता.
२३ मे ते २ जून या कालावधीत सीएसी ऑलराऊंडर्सचे संचालक अमोल खंते यांच्या मार्गदर्शनात आयोजित करण्यात आलेल्या भृगू लेक ट्रेकला ॲपल फार्म येथून प्रारंभ झाला. कुलंग ते मोरीदुघ असा खडतर टप्पा पार करत ट्रेकर्सनी मोरीदुघ येथे मुक्काम केला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सर्व सहभागी भृगू लेकच्या दिशेने रवाना झाले. सुमारे १४,१०० फूट उंचीवरील या सरोवरापर्यंतचा प्रवास घनदाट पाइन व देवदार वृक्षांची जंगले, हिरवीगार कुरणे आणि बर्फाच्छादित पर्वतरांगा पार करत हे आठ साहसीवीर गोठलेल्या आणि नयनरम्य भृगू लेकपर्यंत यशस्वीरीत्या पोहोचले.
आमच्यापैकी काहीजण पहिल्यांदाच हिमालयीन ट्रेकमध्ये सहभागी झाले होते. हा आमच्यासाठी केवळ पर्वतारोहणाचा अनुभव नव्हता तर त्यामुळे आमचा आत्मविश्वास वाढला. संघभावना, शिस्त शिकण्यासाठी आणि निसर्गाशी जवळीक साधण्यासाठी या ट्रेकची खूप मदत झाली, असे या आठ जणांच्या टीमने म्हटले आहे. या ट्रेकच्या यशस्वी आयोजनासाठी अनुभवी ट्रेक लीडर्स शिरीष देशमुख आणि सूरज गजभिये यांनी मोलाचे मार्गदर्शन व परिश्रम घेतले.










