लोकवाहिनी न्यूज
यवतमाळ : प्रभू श्रीराम सध्या भोंदू लोकांच्या गराड्यात सापडले असून, त्यांच्या सुटकेसाठी शिवसेनेला आता ‘भाजप मुक्त राम’ ही मोहीम हाती घ्यावी लागेल आणि त्यासाठी महाराष्ट्रभरात पहिली ठिणगी टाकून आंदोलन सुरू केले जाईल, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी केली. ठाकरे यांनी फुटीर खासदारांच्या मतदारसंघात सभांची सुरुवात केली असून आज यवतमाळमध्ये त्यांची तोफ धडाडली.
नीट पेपरफूट, शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिलांवरील वाढते अत्याचार, पीक विम्याची अपूर्णता आणि राम मंदिराच्या नावाखाली होणारी लूट या मुद्द्यांवर संसदेत तोंड उघडण्याचे धाडस गद्दारांच्या रक्तात उरले आहे का? असा सवाल उद्धव ठाकरे यांनी उपस्थित केला.
लोकमान्य टिळक किंवा महात्मा गांधी यांनी कधी ‘विकास निधी मिळत नाही’ म्हणून चळवळ थांबवली नव्हती. तसेच, भाजपचे ज्येष्ठ नेते अटल बिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण अडवाणी यांनी काँग्रेसविरोधात शून्यातून संघर्ष केला. त्यांनी कधी निधीसाठी पक्षांतर केले नाही. जर त्यांनी त्या काळात निधीसाठी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असता, तर आज मोदी शाहांचा राजकीय जन्म झाला असता का? असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी आज केला.












