लोकवाहिनी न्यूज
मुंबई : विमानापेक्षा इमान महत्त्वाचे असते. त्यामुळे २०१९ ला ज्यांनी बेईमानी केली, तेव्हा महाराष्ट्राच्या जनतेने एकाच विमानाने प्रवास करण्यासाठी तिकीट दिले होते. अशी खडतर टीका करत, मुख्यमंत्री फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने केलेल्या प्रवासावर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली.
पुढे शिंदे म्हणाले, त्यांनी (उद्धव ठाकरे) तेव्हा काँग्रेसच्या बुडत्या जहाजांनी प्रवास सुरू केला. आता ते गटांगळ्या खात आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे खूप हुशार आहेत. त्यांनी २०१९ ला कपटी मित्र किती घातक असतो हे पाहिले आहे, असे म्हणत एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरे यांना डिवचले. राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा हालचाली वाढलेल्या असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने केलेल्या प्रवासाची जोरदार चर्चा रंगली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या विमान प्रवासदरम्यान उद्धव ठाकरे यांच्यासोबत खासदार संजय राऊत, आदित्य ठाकरे तसेच ठाकरे गटातील काही प्रमुख नेतेही उपस्थित होते. प्रवासदरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानातून केलेल्या प्रवासावरून राजकीय चर्चा उधाण आले असताना, शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी यावर प्रतिक्रिया देत हा संपूर्ण प्रकार योगायोग असल्याचे स्पष्ट केले. दोन नेते एकाच दिशेने प्रवास करत असतील, तर त्यात विशेष काही पाहण्यासारखे नाही, असे मत व्यक्त करत त्यांनी अशा भेटींना अनावश्यक राजकीय अर्थ लावला जाऊ नये असे सांगितले. तसेच सर्व नेते एकाच विमानांतून प्रवास करत असतील, तर त्यातून व्यवहार्यता आणि वेळेची बचत होते, असे सूचक विधानही त्यांनी केले. याचवेळी त्यांनी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करत फोडाफोडीच्या राजकारणावर टीका केली आणि सध्या सुरू असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर शेतकरी प्रश्नांवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचेही अधोरेखित केले.
फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांची भेट झाली असून, दोन्ही नेत्यांमध्ये हस्तांदोलन झाल्याचेही सांगण्यात येते. तसेच काही वेळासाठी दोघांमध्ये औपचारिक संवाद झाल्याची माहितीही समोर आली आहे. या भेटीनंतर, मुख्यमंत्री फडणवीस यांनी ही भेट महत्त्वाची आहे, अशी प्रतिक्रिया देत चर्चेला अधिक उधाण दिले होते. तर उद्धव ठाकरे यांनी ही एक उच्चस्तरीय चर्चा होती, असे म्हणत या भेटीला वेगळा अर्थ असल्याचे संकेत दिले होते. त्यामुळे या विमान प्रवासाकडे केवळ योगायोग पाहावे की, त्यामागे काही राजकीय संदेश आहे, यावर चर्चा सुरू झाली आहे.
या घडामोडींवर उपमुख्यमंत्री शिंदे यांनी या विषयावर थेट आणि स्पष्ट शब्दांत भाष्य केले. शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे ठाकरे गटावर टीका करताना जनतेने दिलेले तिकीट योग्य दिशेने वापरले नाही, असा टोला लगावला. तसेच २०१९ मधील राजकीय घडामोडींचा संदर्भ देत त्यांनी ठाकरे गटाच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित केले.
शिंदे यांनी पुढे बोलताना इमान आणि विमान यात फरक असतो, असा सूचक टोला लगावला असून, राजकारणात विश्वास आणि भूमिका महत्त्वाची असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यांच्या मते, काही नेत्यांनी २०१९ मध्ये घेतलेल्या निर्णयांमुळे राज्याच्या राजकारणात मोठे बदल झाले आणि त्याचे परिणाम आजही दिसत आहेत. राज्यात यापूर्वीच ऑपरेशन टायगरच्या चर्चेमुळे राजकीय वातावरण तापलेले असताना, शिवसेना ठाकरे गटातील काही खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने परिस्थिती अधिकच गुंतागुंतीची झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर फडणवीस आणि ठाकरे यांचा एकाच विमानातील प्रवास अधिकच महत्त्वाचा मानला जात आहे. या संपूर्ण घटनेमुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा नव्या चर्चांना सुरुवात झाली असून, पुढील काही दिवस या भेटीचे राजकीय अर्थ लावले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.












