भारत-न्यूझीलंड आर्थिक सहकार्याला नवी दिशा
लोकवाहिनी न्यूज
वेलिंग्टन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारत हा केवळ मोठी बाजारपेठ नसून जागतिक विकासाचे ‘लाँचपॅड’ बनल्याचे ठामपणे सांगितले. न्यूझीलंडचे पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सन यांच्या उपस्थितीत ऑकलंड येथे दोन्ही देशांतील प्रमुख उद्योगपती आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना (सीईओ) संबोधित करताना त्यांनी भारत-न्यूझीलंड आर्थिक सहकार्याला नवी दिशा देण्याचे आवाहन केले. मुक्त व्यापार करारामुळे (एफटीए) व्यापार, गुंतवणूक, तंत्रज्ञान, सेवा आणि कुशल मनुष्यबळाच्या देवाणघेवाणीसाठी मोठ्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मोदी म्हणाले की, भारत आणि न्यूझीलंड हे लोकशाही, कायद्याचे राज्य, विविधतेचा आदर आणि शाश्वत विकासाच्या समान मूल्यांनी जोडलेले आहेत. या सामाजिक मूल्यांच्या बळावर दोन्ही देशांतील आर्थिक भागीदारी अधिक मजबूत होईल. अवघ्या नऊ महिन्यांच्या विक्रमी कालावधीत मुक्त व्यापार करार पूर्ण होणे ही द्विपक्षीय संबंधांतील ऐतिहासिक कामगिरी असल्याचे त्यांनी नमूद केले. वर्ष २०३० पर्यंत दोन्ही देशांमधील द्विपक्षीय व्यापार दुप्पट करून सात अब्ज न्यूझीलंड डॉलरपर्यंत नेण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
न्यूझीलंडने पुढील १५ वर्षांत भारतात २० अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याची बांधिलकी जाहीर केल्याचे सांगताना मोदी यांनी ही केवळ आर्थिक गुंतवणूक नसून भारताच्या विकास प्रवासातील भागीदारी असल्याचे स्पष्ट केले.













