मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे व्यवस्थापन व अधिसभा सदस्य तथा काटोल तालुक्यातील देवग्राम येथील अंत्योदय महाविद्यालयाचे (स्वायत्त) प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगडे यांना महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचा राज्यस्तरीय डॉ. जे. पी. नाईक आदर्श राज्य शिक्षक २०२५-२६ पुरस्काराने सम्मानित करण्यात आले.
पुरस्कार वितरण समारोह सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या ज्ञानेश्वर सभागृहात शनिवारी पुणे येथे पार पडला. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते सपत्निक प्रदान करण्यात आला. रोख रक्कम, सन्मान चिन्ह, शासनाचे सन्मानपत्र, शाल व श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
यावेळी उच्च शिक्षण संचालक डॉ. शैलेंद्र देवळाणकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी व इतर मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डॉ. देवेंद्र भोंगडे हे २०१२ पासून विद्यापीठाच्या प्राधिकरणावर कार्यरत असून, त्यांची विविध संशोधनात्मक पुस्तके प्रकाशित झाली आहे. त्यांच्या मार्गदर्शनात ४ विद्यार्थ्यांना पी. एचडी.पदवी प्राप्त झाली असून, ७ विद्यार्थी पी. एचडी. करीत आहेत. त्यांचे विविध संशोधन पत्रिकेत लेख प्रकाशित झाले असून, विविध राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभाग घेतला आहे.
त्यांना या आधी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा २०२३ मध्ये विद्यापीठस्तरीय उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार तर २०२५ मध्ये विद्यापीठाचे डॉ. आर. कृष्णकुमार सुवर्णपदक प्राप्त झाले आहे. विद्यापीठाच्या सर्व समित्यांवर अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी कार्य केले आहे. अधिसभा सदस्य म्हणून विद्यार्थी व शिक्षकांच्या प्रश्नासाठी सक्रिय, भरीवपणे ते कार्य करीत आहे. डॉ. देवेंद्र भोंगडे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर, प्र-कुलगुरू डॉ. अखिलेश पेशवे, कुलसचिव डॉ. विजय खंडाळ, व्यवस्थापन परिषदेचे सर्व सदस्य, अधिसभेचे सर्व सदस्य, जीवन विकास संस्थेचे पदाधिकारी, महाविद्यालयातील शिक्षक, कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.











