उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात दिलखुलास चर्चा
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : माझे कुटुंब, माझी बायको, माझी लेक मला कायम काम करण्यासाठी प्रोत्साहन देत राहतात. नागपुरात आम्ही लोक घरांचा पत्ता विचारत नाही कोण कोणाच्या घराजवळ राहतो असे आम्ही पत्ता सांगतो. माझे अनेक मित्र असे आहेत की, त्यांच्यासाठी मी मुख्यमंत्री नाही. विरोधक टीका करत राहतात, ते सर्व ऐकण्याची तयारी ठेवतो. माझी चाल कासवाप्रमाणे नाही, पण माझी प्रेरणा कासवाची आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
बुटीबोरी औद्योगिक वसाहतीतील ‘आवाडा ग्रुप’ कॅम्पसमध्ये आयोजित उद्योजकांशी संवाद कार्यक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलखुलास मुलाखत दिली. या कार्यक्रमादरम्यान त्यांनी प्रशासकीय कामे, कुटुंबिक पाठबळ, मित्रपरिवार, समृद्धी महामार्गाचा प्रवास आणि विरोधकांचे टीकास्त्र यावर मोकळेपणाने चर्चा केली.
पुढे बोलताना महायुतीच्या समन्वयावर आणि महत्त्वाकांक्षी प्रकल्पांवर प्रकाश टाकत ते म्हणाले की, आपले महायुतीचे सरकार आहे, आपण जर पूर्ण मनाने एखादे काम केले तर सहयोगी पक्ष मदतीसाठी येतात. मी समृद्धी महामार्ग तयार करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा सहयोगी पक्षांनी मला सहयोग केला आणि माझ्यासोबत कायम राहिले. पण शरद पवार यांनी तेव्हा विरोध केला, उद्धव ठाकरे यांनी देखील विरोध केला, जेव्हा की ते आमच्या महायुतीचा भाग होते. पण मी माझ्या ध्येयाला धरून काम करत राहिलो आणि आज समृद्धी महामार्ग तयार झाला आहे. एका वर्षात आम्ही जमिनी अधिग्रहण केल्या, जे लोक विरोधात बोलायचे ते आज या प्रकल्पाचे गुणगान गात आहेत आणि त्यामुळे सगळ्या विरोधकांचे तोंड बंद झाले आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
नागपूर सोलर इकोसिस्टीमचे हब होणार
देशातील सर्वात मोठी सोलर मॉडेल इकोसिस्टीम नागपूर येथे आकार घेत आहे. येत्या दहा वर्षात नागपूर हे सोलर इकोसिस्टीम चे हब होणार आहे. त्यामुळे उद्योजकांनी या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करावी असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी उद्योजकांना केले.
समृद्धी महामार्गामुळे राज्याच्या मागास भागात विकासाला आवश्यक असलेल्या सुविधा निर्माण होत असून जेएनपीटी बंदरासोबतच वाढवण पोर्ट बंदर हे जगातील पहिल्या दहा बंदरंमध्ये समाविष्ट होणार आहे, येथून समांतर रेल्वेच्या डेडिकेटेड फ्रेट कॉरिडॉरद्वारे गडचिरोलीपर्यंत पोहोचणे शक्य होणार आहे. यामुळे लॉजिस्टिक खर्च ६० टक्क्यांपेक्षा कमी होईल आणि राज्याच्या विकासाला मोठी संधी उपलब्ध होणार आहे. वाढवण बंदर येत्या तीन वर्षात पूर्ण होईल असा विश्वास व्यक्त करताना वाढवण हे ग्रीन पोर्ट असून सर्वात सक्षम राहणार असल्याचे ते म्हणाले.
नवीन नागपूरच्या प्रकल्पाविषयी बोलताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, येथे स्मार्ट इंडस्ट्रीसाठी इकोसिस्टीम तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पासाठी पन्नास टक्के पेक्षा अधिक जागा अधिकृत झाली असून गुंतवणुकीसाठी प्रोत्साहन मिळत आहे. देशातील पहिले सोलर मॉडेल अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात तयार होत असून अवाडा समूहाला त्यांच्या प्रकल्पाच्या विस्तारासाठी २५० एकर जागेची आवश्यकता आहे. ती देण्याची घोषणाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली.
अतिरिक्त बुटीबोरी क्षेत्रात उद्योगांसाठी अधिग्रहित केलेली जमीन संपली असून तिसरी अतिरिक्त बुटीबोरी औद्योगिक वसाहत तयार करावयाची आहे, तसेच वर्धा जिल्ह्याला नवीन औद्योगिक क्षेत्रासाठी भूसंपादन सुरू असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
अवाडा हा सोलर मॉडेल बनवणारा सर्वात मोठा सुपर उद्योग असून, एंडव्हान्स इंटिग्रेशनमुळे स्मार्ट मॉड्यूुलची निर्मिती होत आहे. भूमिपूजनानंतर वेगाने प्रकल्प पूर्ण झाला असून आज पाच हजार कामगार येथे काम करत असल्याचे मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
मुंबईत वेस्टर्न एक्सप्रेस वे ला आम्ही समांतर रोड तयार करणार आहोत, ठाणे -बोरिवली हा नवा मार्ग तयार करत आहोत, आता बुलेट ट्रेन आणि मुंबई विमानतळ जोडले जाणार आहे. मुंबईत कोणीही कुठेही ४५ मिनिटांत पोहोचू शकेल असा आमचा प्रयत्न आहे. तिसरी मुंबई आम्ही तयार करत आहोत. मुंबईला झोपडपट्टीमुक्त शहर करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. या प्रक्रियेला दहा-बारा वर्षे लागेल. परंतु त्याची सुरुवात आम्ही केली असल्याचे ते म्हणाले.











