अमेझॉन, मेशोवरून खरेदी; तरुणी, महिला, बालकांचाही वापर
प्रसन्न जकाते
नागपूर : वेगवेगळ्या मार्गाने उपराजधानी नागपुरात येणाऱ्या ड्रग्ज तस्करीसाठी आता अमेझॉन आणि मेशोवर मिळणाऱ्या खास कपड्यांचा वापर सुरू करण्यात आला आहे. ग्वाल्हेरहून रस्ता मार्गे आणि मुंबईहून रेल्वेने नागपुरात एमडी आणि हेरॉईनचा साठा येतो. हा साठा आणण्यासाठी तस्करांकडून मुली, महिला आणि बालकांचाही वापर करण्यात येत आहे.
कमी वेळात जास्त पैसे कमविण्याचे आमिष दाखवत तस्कर तरुण मुलंमुली, महिला आणि त्यांच्या बालकांचा वापर करून घेतात. या सर्वांना एकत्र ऑनलाइन मिळणारे हिडन पॉकेट असलेले कपडे देण्यात येतात. प्रसंगी स्थानिक पातळीवर तयार केलेले व चोर कप्पा असलेले कपडेही देण्यात येतात. पोलिसांचा सहजासहजी संशय जाणार नाही, अशी वेषभूषा या लोकांना करून देण्यात येते.
महिला आणि मुली आंतरवस्त्रात हिडन पॉकेट असलेल्या कपड्यांमध्ये एमडी आणि हेरॉईन लपवितात. पावडरचे वजन जास्त असेल तर मुलांनाही तशा पद्धतीने अंडरगारमेंट्स दिले जातात. रेल्वे मध्ये आरपीएफकडून अलीकडच्या काळात श्वान पथकाचा वापर केला जात आहे. डॉग स्क्वॉडच्या मदतीने अमली पदार्थांचा शोध घेतला जातो. याउलट बसमध्ये अशी तपासणी केली जात नाही. त्यामुळे आरपीएफच्या डॉग स्क्वॉडची दिशाभूल करण्यासाठी खास प्रकारचे सुगंधी द्रव्यही तस्करांकडून वापरले जाते.
वेगवेगळ्या मार्गाने तस्करी एकाच वेळी प्रचंड मोठ्या वजनाची पावडर आणणे टाळले जाते. एकाच बसमध्ये किंवा रेल्वेतून शक्यतोवर तस्कर एकत्रपणे प्रवास करीत नाही. प्रत्येक तस्कराजवळ जास्तीत जास्त २५० ग्रॅम पावडरच असते. त्यातून पकडले जाण्याची जोखीम कमी होते. विमानतळावर अत्यंत बारकाईने तपासणी केली जाते. त्यामुळे कधीही हवाईमार्गे तस्करी केली जात नाही. खासगी बसेस, खासगी कार, पिक अप व्हॅन, ट्रक, रेल्वेतील एसी कोच आणि प्रसंगी दुचाकीनेही ब्रेकजर्नी करीत नागपूरपर्यंत ड्रगचा साठा पोहोचतो. मात्र या संपूर्ण प्रवासात पोलिसांचे खबरे आणि नाकाबंदी कुठेच नसते का? असा प्रश्न निर्माण होत आहे













