ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : देशामधील निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवरून आणि भारतीय निवडणूक आयोगाच्या कारभारावरून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केंद्र सरकार आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्यावर गंभीर आरोप करून ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. शब्दांत जोरदार हल्लाबोल केला आहे. महाराष्ट्र, हरियाणा आणि मध्य प्रदेश या राज्यांमधील निवडणुकीच्या निकालांवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, सर्वत्र सत्ताविरोधी लाट असतानाही भाजप प्रत्येक निवडणूक कशी जिंकते? असा सवाल राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केला. या प्रकरणात जे-जे आरोपी असतील, ज्यांनी ज्यांनी निवडणुका चोरल्या, मतं चोरली, त्यांना आज ना उद्या शिक्षा करणारच, असा इशारा राहुल गांधी यांनी दिला.
राहुल गांधी म्हणाले, देशामध्ये मोठ्या प्रमाणावर ‘वोट चोरी’ आणि मतांची हेराफेरी सुरू आहे. मतदाराचे मत योग्य ठिकाणी जाते की नाही, हे तपासण्याची मुख्य जबाबदारी मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांची होती. मात्र, त्यांनी प्रत्येक निवडणुकीत गोंधळ घातला असून, हे थेट देशविरोधी कृत्य आणि संविधानावर झालेला हल्ला आहे. त्यामुळे ज्ञानेश कुमार यांनी एका क्षणाचाही विलंब न करता आपल्या पदाचा तातडीने राजीनामा द्यावा.
निवडणूक आयोगाच्या कारभारावर बोट ठेवताना राहुल गांधी म्हणाले की, व्यवस्थेच्या गोंधळावर आणि लोकशाहीच्या मुळावर उठलेल्या या कारस्थानाला ज्ञानेश कुमार जबाबदार आहेत. आयोगातील इतर दोन निवडणूक आयुक्तांनीच ज्ञानेश कुमार यांच्या निर्णयांवर आक्षेप नोंदवले आहेत. यामुळे आमचा संशय खरा ठरला असून, २०१४ च्या निवडणुकीसह इतर विधानसभा निवडणुकांमध्येही मतांची चोरी झाल्याचे यावरून सिद्ध होते.
या संपूर्ण प्रकरणावरून काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांना लक्ष्य केले. राहुल गांधी म्हणाले की, ज्ञानेश कुमार हे पंतप्रधान मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी निवडलेले अधिकारी आहेत. या संपूर्ण कटाचे मुख्य सूत्रधार पंतप्रधान आणि गृहमंत्रीच असून, ज्ञानेश कुमारांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.













