कुख्यात रोशन मोहितेला वणीतून अटक
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नंदनवन पोलिस ठाण्याच्या हद्दीतील हसनबाग चौकात बुधवारी रात्री उशिरा महाल भागातील कुख्यात गुंड रोशन मोहिते याने धावत्या कारमधून पिस्तुलाने हवेत गोळीबार परिसरात दहशत निर्माण झाली. ही घटना बुधवारी रात्री उशिरा १.३० च्या सुमारास घडल्याचे सांगण्यात येत आहे. मोहिते याने खिडकीतून हात बाहेर काढून पिस्तुलाने हवेत गोळीबार केला आणि त्यानंतर भरधाव कार हसनबाग चौकाच्या दिशेने नेली. नंदनवन पोलिसांनी रोशन मोहिते याच्यावर गुन्हा दाखल केला. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट ४ ने गुरुवारी सायंकाळी आरोपीला वणी येथे अटक केली. अटकेनंतर पुढील तपासासाठी त्याला नंदनवन पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
मिळालेल्या माहितीनुसार, हसनबाग येथील रहिवासी आबिद खान मोहम्मद खान (४८) हे बुधवारी रात्री सुमारे १.३० वाजता दुचाकीवरून घरी परतत होते. हसनबाग चौकातील डी.एल. मोटर्सजवळ उड्डाणपुलाखाली वळण घेत असताना त्यांना एक कार जवळ येताना दिसली. चालकाने अचानक खिडकीतून हात बाहेर काढून पिस्तुलातून हवेत गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर, आरोपी भरधाव वेगाने गाडीतून पळून गेला.
या घटनेनंतर काही काळ परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले होते. आबिद खानच्या तक्रारीच्या आधारे नंदनवन पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, गाडी रोशन मोहितेच्या नावावर असल्याचे उघड झाले. पोलिसांनी घटनास्थळावरील आणि आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून आरोपीचा शोध सुरू केला. गुरुवारी संध्याकाळी, गुन्हे शाखा युनिट ४ च्या पथकाने वणी येथे रोशन मोहितेला अटक केली. पोलिस आता गोळीबारात वापरलेले शस्त्र, घटनेमागील हेतु आणि आरोपीसोबत उपस्थित असलेल्या इतर व्यक्तींची चौकशी करत आहेत.













