प्रमुख पक्षांसोबत बंडखोर, अपक्ष उमेदवारांचे आव्हान
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघातील पाच जागांसाठी निवडणुकीचे चित्र आता स्पष्ट होऊ लागले आहे. पुणे शिक्षक, पुणे पदवीधर, नागपूर पदवीधर, अमरावती शिक्षक आणि छत्रपती संभाजीनगर पदवीधर या पाच मतदारसंघांसाठी २३ ऑक्टोबरला मतदान होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपल्यानंतर, प्रमुख पक्षांसोबतच बंडखोर आणि अपक्ष उमेदवारी मैदानात उतरल्याचे दिसून आले आहे, मात्र अंतिम चित्र ९ ऑक्टोबरला उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत संपल्यानंतर स्पष्ट होणार आहे.
पुणे शिक्षक मतदारसंघ येथे भाजपाचे कौस्तुभ गावडे आणि काँग्रेसचे जयंत आसगावकर प्रमुख उमेदवार आहेत. शिवसेनेचे मंगेश चिबटे यांनीही अर्ज दाखल केला आहे. सचिन सानप यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केल्याने या मतदारसंघात अतिरिक्त उमेदवारांमुळे समीकरणे बदलण्याची शक्यता आहे. पुणे पदवीधर मतदारसंघात भाजपाच्या डॉ. स्मिता जाधव आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाच्या हर्षा देशमख-जाधव यांच्यात प्रमुख लढत आहे. मात्र, राष्ट्रवादीचे भैय्या माने यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने या पक्षासमोर आव्हान निर्माण झाले आहे, माजी आमदार दत्ता सावंत यांनीही अपक्ष अर्ज दाखल केला आहे, त्यामुळे या मतदारसंघात अनेक उमेदवारांमुळे लढत बहुकोनी झाली आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघात भाजपाचे सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे अभिजित वंजारी यांच्यात प्रमुख लढत आहे. भाजपाचे माजी आमदार अनिल सोले यांनी अपक्ष अर्ज दाखल केल्याने भाजपासमोर बंडखोरीचे आव्हान उभे राहिले आहे. नितेश कराळे यांच्यासह इतर अपक्ष उमेदवारांनीही अर्ज दाखल केले आहेत. अमरावती शिक्षक या मतदारसंघासुद्धा अनेक उमेदवार मैदानात आहेत. काँग्रेसच्या अदिती पोहरे आणि ठाकरे गटाचे दत्तात्रय लहाने यांच्यासह शिवसेनेचे किरण सरनाईक यांनी अर्ज दाखल केला आहे. विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे दिलीप कडू आणि शिवसेनेचे माजी आमदार श्रीकांत देशपांडे यांच्यासह इतर उमेदवारांनीही अर्ज दाखल केल्याने येथे बहुकोनी लढतीचे चित्र आहे.
छत्रपती संभाजीनगर पदवीधर राष्ट्रवादी काँग्रेसचे सतीश चव्हाण आणि ठाकरे गटाचे दिलीप घुगे यांच्यासह भाजपाचे एम.के. देशमख यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) गटाचे प्रतापसिंह पाटील यांनीही अर्ज दाखल केल्याने येथे प्रमुख पक्षांमध्ये अतिरिक्त उमेदवारांचे चित्र आहे. पाचही मतदारसंघांत उमेदवारी अर्ज दाखल झाल्यानंतर आता माघारीच्या टप्प्याकडे लक्ष लागले आहे. कोणते उमेदवार मैदानात कायम राहतात, कोण माघार घेतात आणि अंतिम लढत कोणाकोणात होते, हे ९ ऑक्टोबरनंतर स्पष्ट होणार आहे. त्यानंतरच पाचही मतदारसंघातील निवडणुकीचे अंतिम चित्र समोर येईल.











