फडणवीसांची केंद्राकडे मागणी
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : राज्यातील दुष्काळामुळे कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट झाली असून, तूर पिकालाही मोठा फटका बसला आहे. या परिस्थितीचा परिणाम आगामी रब्बी हंगामातील पिकांवरही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे संकटात सापडलेल्या शेतकरी आणि शेतमजुरांना मदत करण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला वाढीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.
दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पथकासोबत मुख्यमंत्र्यांनी बैठक घेतली, या बैठकीत राज्यातील शेती, पिकांचे नुकसान, पाण्याची उपलब्धता आणि पशुधनासमोरील आव्हानांवर चर्चा करण्यात आली. केंद्रीय पथकाने राज्यातील विविध भागांचा दौरा करून दुष्काळी परिस्थितीची पाहणी केली, या पाहणीत आढळलेल्या परिस्थितीची माहिती पथकाचे सदस्य मुख्यमंत्र्यांना दिली. या बैठकीला मंत्री गिरीश महाजन, दत्तात्रय भरणे आणि मकरंद पाटील यांच्यासह केंद्रीय दुष्काळ पाहणी पथकाचे प्रमुख, केंद्रीय सहसचिव मुक्तानंद अग्रवाल आणि पथकातील अन्य सदस्य उपस्थित होते.
केंद्रीय पथकाच्या पाहणीत राज्यातील कापूस आणि सोयाबीनच्या उत्पादनात घट झाल्याचे दिसून आले. तूर पिकावरही दुष्काळाचा परिणाम झाला आहे. पावसाची कमतरता आणि पाण्याच्या उपलब्धतेतील घट यामुळे शेतीसमोरील अडचणी वाढल्या आहेत. दुष्काळाचा परिणाम केवळ खरीप पिकांपुरता मर्यादित न राहता रब्बी हंगामातील पिकांवरही होऊ शकतो, अशी चिंता मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
या परिस्थितीत शेतकरी आणि शेतमजुरांना दिलासा देण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांचे नुकसान कमी करण्यासाठी आणि ग्रामीण भागातील नागरिकांना संकटातून बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारने महाराष्ट्राला अधिक आर्थिक मदत द्यावी, असे आवाहन फडणवीस यांनी केले. दुष्काळाच्या काळात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होऊ नये, यासाठी राज्य सरकारने नियोजन केले आहे. पिण्याच्या पाण्याबरोबरच पशुधनासाठीही पाणी उपलब्ध राहावे, याला प्राधान्य देण्यात आले आहे. उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करून तो आवश्यक कामांसाठी राखून ठेवण्यात आला आहे. भविष्यात पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाल्यास परिस्थितीचा सामना करण्यासाठी व्यापक योजना तयार ठेवण्याची तयारी सरकारने केली आहे.
दुष्काळात जनावरांचे संरक्षण करणेही महत्त्वाचे आहे. पाण्याचा अभावी पशुधनाचे नुकसान होऊ नये, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले. शेतकऱ्यांसोबतच पशुधनाची काळजी घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय पथकाने राज्यातील विविध भागांचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी त्यांचे आभार मानले. राज्य सरकारने दुष्काळासंबंधीचा प्राथमिक अहवाल केंद्राला सादर केला असून, अंतिम अहवालही लवकरच पाठवण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. दुष्काळामुळे निर्माण झालेल्या अडचणींवर मात करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. शेतकरी, शेतमजूर आणि पशुधनाला दिलासा देण्यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.













