सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी भीषण अपघात
लोकवाहिनी न्यूज
नाशिक : सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी नांदुरी टी-पॉइंटजवळ भरधाव कारने पोलिस बंदोबस्तावरील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना धडक दिली. रविवारी मध्यरात्री सुमारे दोन वाजता हा भीषण अपघात झाला. या दुर्घटनेत पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड यांचा मृत्यू झाला, तर तीन पोलिस कर्मचाऱ्यांसह चार भाविक जखमी झाले. जखमींवर शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी कारचालकाला अटक करण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.
सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सव सुरू असल्याने दर्शनासाठी मोठ्या संख्यने भाविक येत आहेत. त्यामुळे नांदुरी गावात ठिकठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आले होते. भाविकांची गर्दी लक्षात घेऊन कळवण आणि अभोणा पोलिस ठाण्याचे कर्मचारी तसेच ग्रामीण वाहतूक पोलिस बंदोबस्तासाठी तैनात होते. अशातच नाशिकच्या दिशेने येणाऱ्या एका भरधाव कारने पोलिसांच्या बंदोबस्ताला धडक दिल्याने परिसरात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, नांदुरी टी-पॉइंटपासून सुमारे ५०० मीटर अंतरावर असलेल्या गतिरोधकजवळ कारने प्रथम एका दुचाकीस्वाराला धडक दिली. त्यानंतर कार चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार विरुद्ध दिशेने गेली. समोरून येणाऱ्या दुसऱ्या कारच्या चालकाच्या बाजूला धडक दिल्यानंतर ही कार रस्त्याच्या मध्यभागी लावलेल्या पोलिस बॅरिकेडवर आदळली. त्यानंतर बंदोबस्तासाठी उभा असलेल्या पोलिस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनही कारने धडक दिली. या अपघातात पोलिस उपनिरीक्षक विजय गायकवाड गंभीर जखमी झाले. त्यांच्या हनुवटीला, छातीला आणि दोन्ही पायांना दुखापत झाली. मात्र, या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलिस निरीक्षक दिनकर मुंडे यांच्या पायाच्या पंनाला दुखापत झाली, तर हेड कॉन्स्टेबल सचिन राऊत यांच्या डाव्या पायाचा पंजा फ्रॅक्चर झाला. अन्य एका पोलिस कर्मचाऱ्यालाही दुखापत झाली आहे.
या अपघातात मुंबईतील भाविक महापे, मोरेश्वर बाळू पाटील, तेजस्वी पाटील आणि गोपाळ सोनवणे हे चार जणही जखमी झाले. सर्व जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कारचालकाने नांदुरी येथे पोहोचण्यापूर्वी इतर काही वाहनांनाही धडक दिल्याप्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे चालक मद्यधुंद अवस्थेत होता का, असा संशय व्यक्त केला जात आहे. मात्र, याबाबत अधिकृत निष्कर्ष समोर आलेला नाही. कळवण पोलिस ठाण्याचे निरीक्षक प्रदीप देशमुख यांनी कारचालकाला अटक केल्याची माहिती दिली. अपघाताचे नेमके कारण आणि चालकाची स्थिती याबाबत पोलिस तपास करत आहेत.













