शहर अतिक्रमणमुक्त मोहिमेला वेग
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महानगरपालिकेच्या वतीने फुटाळा परिसरातील एनएमसी पार्किंगमधील अनधिकृत शेडवर आज धडक कारवाई करून ते पाडण्यात आले. या अतिक्रमणामुळे पार्किंगच्या जागेत अडथळा निर्माण होत होता, जो आता पूर्णपणे दूर करण्यात आला आहे.
शहरातील सार्वजनिक जागा आणि रस्ते अतिक्रमण मुक्त ठेवण्यासाठी महापालिकेची ही मोहीम अधिक तीव्र करण्यात आली आहे. नागरिकांनी स्वतःहून अतिक्रमणे काढून घ्यावीत, अन्यथा नियमानुसार कडक कारवाई सुरूच राहील, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. या कारवाईमुळे नागपूर शहर अतिक्रमणमुक्त करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले आहे..
सदर कारवाई महापालिका आयुक्त, पोलिस आयुक्त नागपूर शहर, उपायुक्त वाहतूक, नागपूर यांच्या संयुक्तिक मार्गदर्शनाखाली करण्यात आली. अतिक्रमण निर्मूलन कारवाईमध्ये धरमपेठ झोनचे सहाय्यक आयुक्त राजकुमार मेश्राम, अतिक्रमण पथक धरमपेठ झोन, एन.डी.एसचे अतिक्रमण विरोधी पथक व केंद्रीय अतिक्रमण पथक संपूर्ण कार्यवाहीमध्ये सहभागी होते.
नागरिकांना आणि वाहनधारकांना होणारा वाहतुकीचा त्रास कमी करणे तसेच शहरात फुटपाथ नागरिकांना मोकळे करून देणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. आगामी दिवसांत शहरातील इतर प्रमुख मार्गांवरही अशाच प्रकारची कडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
















