वडेट्टीवार यांचा राऊतांच्या मागणीला पाठिंबा
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ऐतिहासिक आणि सामाजिक क्रांतीच्या कार्यमुळे नागपूरला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे। याच भूमीवर बाबासाहेबांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धम्माची दीक्षा घेऊन समता आणि मानवतेचा संदेश दिला। दीक्षाभूमी हे सामाजिक परिवर्तन आणि संवैधानिक मूल्यांचे प्रतीक असल्याने नागपूरला ‘दीक्षाभूमी’ नाव देण्याची संजय राऊत यांची भूमिका योग्य असून काँग्रेसचा याला पाठिंबा आहे। काँग्रेस सुद्धा सुद्धा नामांतराच्या मागणीला समोर करेल, यात हरकत काय ? असा सवाल करून काँग्रेसचे विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी नागपूरचे नाव दीक्षाभूमी करण्याच्या मागणीचे समर्थन केले। ते आज नागपुरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते।
तरुणांच्या रोजगाराबाबत त्यांनी मोदी सरकारला घेरले। गेली १२ वर्षे दरवर्षी २ कोटी रोजगार देण्याचे आश्वासन देणारे आणि उद्योगपतींचे तब्बल १६ ते १७ लाख कोटी रुपयांचे कर्ज माफ करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी आता रोजगार निर्मितीची जबाबदारी उद्योगपतींवर ढकलत आहेत। नोकऱ्या देण्याची जबाबदारी सरकारची आहे की उद्योगपतींची? स्वतःचे अपयश लपवून उद्योगपतींकडे बोट दाखवणे हा तर ‘उलटा चोर कोतवाल को डाँटे’ असा प्रकार आहे, अशा तिखट शब्दांत वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारवर संताप व्यक्त केला।
यावेळी त्यांनी भाजप आमदारांच्या शिक्षेनेनंतरही त्यांना दिले जाणारे अभय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या इंदू मिल स्मारकाचा रखडलेला प्रकल्प, राज्यातील भीषण दुष्काळ आणि दीक्षाभूमी स्थानक नामकरणाच्या मुद्द्यावरून महायुती सरकारला धारेवर धरले।
गुरुवारी ‘फिक्की’च्या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्योगपतींना रोजगार निर्मितीबाबत केलेल्या आवाहनाचा विजय वडेट्टीवार यांनी खरपूस समाचार घेतला। सरकारने गेल्या १२ वर्षांत ‘ईझ ऑफ डूइंग बिझनेस’च्या नावाखाली उद्योगपतींचे १६ लाख कोटी रुपये माफ केले, कॉर्पोरेट कर ३० टक्क्यांवरून २२ टक्क्यांपर्यंत करसवलत दिली। तरीही देशात रोजगार वाढले नाहीत, हे खुद पंतप्रधानांनीच मान्य केले आहे।
१९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळ
राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर बोलताना वडेट्टीवार यांनी केंद्र सरकारच्या दुजाभावावर बोट ठेवले। राज्यात १९७२ पेक्षाही भयंकर दुष्काळ असून सध्या सुमारे ६७ टँकर सुरू आहेत। एकट्या धाराशिव जिल्ह्यात १८६ ट्रॅक्टर टँकर सुरू झाले आहेत। तर पुढील महिन्यात लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागेल अशी भीषण स्थिती आहे।
लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी अमेरिकेत जाऊन देशातील वाढत्या बेरोजगारीवर भाष्य केले, तेव्हा भाजप नेत्यांना मिरच्या झोंबल्या होत्या। आज स्वतः पंतप्रधान आपले अपयश मान्य करत आहेत। डॉ. मनमोहन सिंग यांच्या काळात जागतिक मंदी असूनही भारताच्या पंतप्रधानांना जागतिक मंचावर पहिल्या ४ ते ५ रांगांत सन्मानाचे स्थान होते; आज मात्र अमेरिकेपुढे झुकण्याच्या धोरणामुळे भारताला शेवटच्या रांगेत उभे केले जात असल्याची टीका वडेट्टीवार यांनी केली।
राज्यातील महायुती सरकार कायद्याची अंमलबजावणी केवळ आपल्या सोयीसाठी करत असल्याचा गंभीर आरोप वडेट्टीवार यांनी केला। ते म्हणाले की, काँग्रेस नेते सुनील केदार यांना शिक्षा सुनावल्यानंतर अवघ्या २ दिवसांत त्यांची आमदारकी रद्द करण्यात आली। राहुल गांधी यांची खासदारकी काढून घेऊन त्यांना घर सोडायला लावले। मात्र, भाजप आमदार महेश बालदी यांना अलिबाग न्यायालयाने महिलेचा विनयभंग, मारहाण आणि अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी ३ वर्षांची शिक्षा सुनावूनही महिने उलटले तरी त्यांची आमदारकी रद्द केलेली नाही। एकीकडे ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’चा नारा द्यायचा आणि दुसरीकडे महिलेचा विनयभंग करणाऱ्या आमदाराला अभय द्यायचे, हा कोणता न्याय आहे? यापूर्वी माणिकराव कोकाटे, महेंद्र दळवी आणि उमरेडच्या तत्कालीन आमदारांनाही असेच अभय दिले गेले। सत्ताधाऱ्यांसाठी कायदा वेगळा आणि विरोधकांसाठी वेगळा, ही लोकशाहीची हत्या असल्याचा घणाघात त्यांनी केला।
महाराष्ट्रात भाजपचे ९ आणि शिंदे गटाचे ७ असे कमी खासदार निवडून आल्याचा राग धरून केंद्र सरकार महाराष्ट्राला दुय्यम वागणूक देत आहे। गुजरातला न मागता तात्काळ निधी दिला जातो, मात्र महाराष्ट्राला केवळ १००० कोटी रुपये देऊन शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले जात आहे, असेही वडेट्टीवार म्हणाले। दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बोलावलेल्या ओबीसी मंत्र्यांच्या बैठकीला महाराष्ट्रातून माधुरी मिसाळ जाणार असल्याच्या मुद्द्यावर बोलताना, ज्यांनी कधीच ओबीसींची भूमिका मांडली नाही त्यांना बोलावून सरकार केवळ दिखावा करत असल्याचा वडेट्टीवार म्हणाले।















