समाजातील स्थान गमावल्याचाही आरोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : एकेकाळी साहित्यिक आणि समाजसेवक हे सामान्य जनतेचे आयकॉन होते. समाज त्यांचे म्हणणे गांभीर्याने ऐकत होता. मात्र, साहित्यिकांनी आता हे स्थान गमावले आहे. साहित्याचा उद्देश केवळ मनोरंजन एवढाच मर्यादित राहिला असून, समाजही साहित्यिकांकडे पूर्वीसारख्या गांभीर्याने पाहत नाही. त्यामुळे साहित्य आणि साहित्यिकांनी गमावलेले स्थान पुन्हा प्राप्त करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी केले. साहित्य संमेलन केवळ उत्सव किंवा गणेशोत्सवासारखे होऊ नये, तर ते ‘गणोत्सव’ व्हावे. म्हणजेच सामान्य जनतेचा सहभाग, तिचे प्रश्न आणि तिचे जीवन यांना केंद्रस्थानी ठेवणारा साहित्याचा लोकोत्सव व्हावा, अशी अपेक्षाही डॉ. बंग यांनी व्यक्त केली.
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे नियोजित आणि विदर्भ साहित्य संघ, नागपूरतर्फे व दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्राच्या सहकार्याने १०० व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर रविवारी ‘नांदी संमेलनाचे’ आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाचे उद्घाटन ‘सर्च’ फाउंडेशन, गडचिरोलीचे संस्थापक डॉ. अभय बंग यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. सिव्हिल लाइन्स येथील दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या सभागृहात झालेल्या या कार्यक्रमाला मराठी विद्यापीठ, रिद्धपूरचे कुलगुरू डॉ. अविनाश आवळगावकर, दक्षिण मध्य सांस्कृतिक केंद्राच्या संचालक आस्था कार्लेकर, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष डॉ. गिरीश गांधी, कार्यवाह विलास मानेकर यांची मंचावर उपस्थिती होती.
डॉ. बंग म्हणाले, मराठी साहित्याची परंपरा गौरवशाली आहे. मात्र, आजवरच्या साहित्यात भूतकाळातील गौरवगाथा किंवा अन्यायाच्या दुःखगाथा अधिक प्रमाणात मांडल्या गेल्या आहेत. आता साहित्यिकांनी भूतकाळ आणि वर्तमानकाळाच्या पलीकडे जाऊन भविष्याचा वेध घेण्याची गरज आहे. भविष्यात काय घडू शकते, याचे सूचक मार्गदर्शन साहित्यिकांनी आपल्या लेखनातून करावे, अशी समाजाची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. साहित्यिकाला भविष्याचा वेध घेण्याची दूरदृष्टी असते. भालचंद्र नेमाडे आणि महेश एलकुंचवार यांसारख्या साहित्यिकांच्या साहित्यामध्ये ती दिसून येते.
आजच्या समाजासमोर नैतिक उंची असलेले आदर्श नायकांची मोठी उणीव आहे. किमान्या शतकात लेनिन, महात्मा गांधी, नेल्सन मंडेला आणि अल्बर्ट आइनस्टाइन ही जागतिक स्तरावरील महानायकांची मोजकी उदाहरणे दिसतात. मात्र, आजच्या काळात असा एकही महानायक सहजपणे समोर येत नाही. कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) माणसाचा महानायक होऊ शकत नाही. माणसाला नैतिक उंची असलेले, दिशा आणि प्रकाश दाखवणारे महानायक हवे आहेत. साहित्यिकांनी आपल्या लेखनातून अशा महानायकांच्या किमान प्रतिमा तरी निर्माण कराव्यात, असे आवाहन त्यांनी केले.
भारतामध्ये प्रांतिक साहित्य संमेलने आयोजित करण्यात महाराष्ट्राचा क्रमांक पहिला आहे. मराठी भाषेत आतापर्यंत १०० साहित्य संमेलने पार पडली आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने साहित्य संमेलने आयोजित करण्याची परंपरा अन्य कोणत्याही भाषेत आढळत नाही. मात्र, साहित्य संमेलने केवळ हौशी लोकांच्या सहभागापुरती किंवा उत्सवी स्वरूपापुरती मर्यादित राहू नयेत, ती चिंतनाचा उत्सव बनली पाहिजेत, असे मत डॉ. अविनाश आवळगावकर यांनी व्यक्त केले.
संमेलने समाजासाठी ऊर्जास्रोत ठरावी
साहित्य संमेलनांमुळे साहित्यिक एकत्र येतात, साहित्याचा उत्सव साजरा होतो आणि समाजात जनजागृती निर्माण होते, ही निश्चितच समाधानाची बाब आहे. मात्र, संमेलने ही समाजासाठी ऊर्जास्रोत ठरली पाहिजेत. साहित्यिकांचे विचार, अभिव्यक्ती आणि वैचारिक मंथन जनसामान्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. त्यातून समाजाला योग्य दिशा मिळाली पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. अविनाश आवळगावकर यांनी व्यक्त केली.














