पहिल्याच दिवशी ११ पदकांची कमाई : ४ सुवर्ण, ५ रौप्यसह, २ कांस्यपदके
लोकवाहिनी न्यूज
नवी दिल्ली : आशियाई पॅरा गेम्समध्ये भारताने पहिल्याच दिवशी शानदार कामगिरी केली आहे. भारतीय खेळाडूंनी चार सुवर्ण, पाच रौप्य आणि दोन कांस्य अशी एकूण ११ पदके जिंकली. या कामगिरीमुळे भारत पदकतालिका चौथ्या स्थानावर पोहोचला आहे. नेमबाजी, ॲथलेटिक्स, ज्युदो, टेबल टेनिस आणि बॅडमिंटन या खेळांमध्ये भारतीय खेळाडूंनी आपली छाप पाडली.
नेमबाज मोना, अवनी लेखरात चुरशीची लढत
महिलांच्या १० मीटर एर रायफल एसएच१ प्रकारात मोनाने सुवर्णपदक जिंकले. अंतिम फेरीत तिने सहाव्या स्थानवरून पुनरागमन करत २५० गुण मिळवले. भारताचीच अवनी लेखरा हिने २४९.६ गुणांसह रौप्यपदक पटकावले. दोघांमधील गुणांचा फरक केवळ ०.४ होता. या विजयामुळे भारताला २०२८ च्या लॉस एंजेलिस पॅरिलिम्पिक्ससाठी दुसरे कोटा स्थान मिळाले.
ॲथलेटिक्समध्ये तीन सुवर्णपदके
पॅरा ॲथलेटिक्समध्ये निषाद कुमार, सौम्या आणि रिंकू यांनी सुवर्णपदके जिंकली. निषाद कुमारने पहिल्यांदच आंतरराष्ट्रीय लांब उडी स्पर्धेत सहभागी होत ७.११ मीटर अंतर पार केले. वयाच्या सहाव्या वर्षी अपघातात उजवा हात गमावल्यानंतरही त्याने जिद्दीने क्रीडा क्षेत्रात यश मिळवले आहे.
महिलांच्या १५०० मीटर टी१२/टी१३ प्रकारात सौम्याने ५ मिनिटे १२.३९ सेकंड अशी वैयक्तिक सर्वोत्तम वेळ नोंदवत सुवर्णपदक जिंकले. भारताच्या वेंकटेश राधा हिला रौप्यपदक मिळाले. टी११ प्रकारात रखनी व्लासनेनी हिने कांस्यपदक पटकावले. पुरुषांच्या एफ४६ भालाफेक प्रकारात रिंकूने ६५.११ मीटर भालाफेक करत सुवर्णपदक जिंकले. अजित सिंहने ६५.०२ मीटर अंतरासह रौप्यपदक मिळवले. दोघांनीही यंदाच्या हंगामातील सर्वोत्तम कामगिरी केली.













