काँग्रेसला साथ दिल्याप्रकरणी याचिकेवर १७ जूनला सुनावणी!
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महानगरपालिकेच्या सभागृहात प्रभाग क्रमांक ७ मधून निवडून आलेल्या बसपाच्या एकमेव नगरसेविका हर्षा संजय जयस्वाल यांनी सभापतीपदाच्या निवडणुकीत काँग्रेसला मतदान केले. त्यांची ही कृती पक्षविरोधी असल्याचे नमूद करत बसपाचे जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी विभागीय आयुक्तांकडे त्यांना अपात्र ठरविण्याची मागणी केली होती, या याचिकेवर १७ जून रोजी विभागीय आयुक्त यांचेकडे सुनावणी होणार आहे.
या प्रकरणी सविस्तर माहिती अशी की, नागपूर मनपाच्या आशीनगर झोन सभापती निवडणुकीपूर्वी बसपाचे प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष योगेश लांजेवार यांनी व्हीप जारी करत मतदान न करण्याचे बजावले होते. परंतु पक्षाचा व्हीप झुगारून हर्षा जयस्वाल यांनी आशीनगर झोन सभापती निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान केले. त्याचवेळी त्यांच्यावर कारवाई होणार असल्याची जाणीव त्यांना झाली होती. याप्रकरणी त्यांनी चूक कबूल करीत लेखी माफी पक्षाकडे मागितली. परंतु त्यांचा माफीनामा फेटाळण्यात आला. पक्षाने त्यांची कृती बसपाच्या मूलभूत सिद्धांत व तत्त्वाविरुद्ध असल्याचे म्हटले आहे. त्यांचे विरुद्ध अपात्रतेची कारवाई करण्यासाठी एक रीतसर याचिका बसपा जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार यांनी विभागीय आयुक्तांना सादर केली आहे.
ही याचिका मुंबई येथील ‘लॉ चार्टर्ड’ या ख्यातनाम कायदा संस्थेच्या वतीने बॅरि. विनोद तिवारी व अधिवक्ता शौनक कोठेकर यांचे मार्फत दाखल केली असून नागपूर विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी यांचे समक्ष ७ मे रोजी प्राथमिक सुनावणीही झाली. आता ही याचिका पुढील सुनावणीसाठी १७ जून रोजी ठेवण्यात आल्याचा आदेश विभागीय आयुक्त यांनी जारी केला आहे. १७ एप्रिल रोजी आशीनगर झोन सभापतीपदासाठी निवडणूक आयोजित करण्यात आली होती. बसपा प्रदेश अध्यक्ष सुनील डोंगरे यांचे निर्देशानुसार बसपाचे नागपूर जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार यांनी या निवड प्रक्रियेत तटस्थ राहण्याचा पक्षदेश बसपा नगरसेविका हर्षा संजय जयस्वाल यांना विधिवत बजावला होता. परंतु तो आदेश झुगारून काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला त्यांनी मतदान केले. याप्रकरणी गंभीर दखल घेऊन बसपाने हर्षा जयस्वाल यांना प्रथम कारणे दाखवा नोटीस बजावली. त्यानंतर चौकशी समिती नेमून सुनावणी घेण्यात आली.
हर्षा जयस्वाल यांनी दिलेला लेखी माफीनामा हा त्रोटक असल्याने स्वीकार केला जाऊ शकत नाही, अशी एकमुखी शिफारस चौकशी समितीने केली. या चौकशी समितीत बसपाचे वरिष्ठ नेते डॉ. मोहन राइकवार, दादारावजी वूईके व निवृत्त सनदी अधिकारी संजय थूल यांचा समावेश होता. बसपाच्या प्रदेश कार्यकारिणीने तो अहवाल स्वीकारून हर्षा जयस्वाल यांच्याविरुद्ध कारवाईसाठी पुढाकार घेतला. महाराष्ट्र स्थानिक स्वराज्य संस्था सभासद अपात्रता कायद्याखाली विभागीय आयुक्तांसमोर रीतसर याचिका दाखल करण्याचे अधिकार जिल्हा अध्यक्ष योगेश लांजेवार यांना प्रदान करण्यात आले. त्या अनुसार ही याचिका दाखल करण्यात आली. कायद्याच्या तरतुदीनुसार ९० दिवसांत यावर निकाल अपेक्षित आहे.
…तर मनपातील अपात्रतेची पहिलीच कारवाई!
नागपूर मनपाच्या अख्ख्या इतिहासात अपात्रतेची ही पहिलीच कारवाई असून आजपर्यंत कोणतीही याचिका यापूर्वी दाखल झालेली नाही. हर्षा जयस्वाल अपात्र ठरल्यास त्यांना ६ वर्षांसाठी कोणतीही निवडणूक लढविता येणार नाही असाही आदेश देण्यात यावा व नव्याने निवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी याचिकेत करण्यात आल्याची माहिती बॅरिस्टर विनोद तिवारी यांनी दिली.











