लोकवाहिनी न्यूज नागपूर : परंपराच्या धाग्यांना आधुनिकतेची वीण देत विदर्भातील हातमाग उद्योगाला नवी ओळख, नवी बाजारपेठ आणि नव्या पिढीची संधी उपलब्ध करून देण्याच्या महत्त्वाकांक्षी पर्वाचा शुभारंभ शनिवार, १७ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता धापेवाड़ा (कलमेश्वर), नागपूर येथे होणार आहे. यासंदर्भात आज पत्रकार परिषदेत माहिती देण्यात आली.
धापेवाड़ा टेक्सटाइल उद्योग प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या नूतन इमारतीचे लोकार्पण तसेच हातमाग उद्योगाचा शुभारंभ केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व राष्ट्रीय महामार्ग मंत्री तथा या प्रकल्पाचे मार्गदर्शक नितिन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, प्रसिद्ध अभिनेत्री व खासदार हेमामालिनी यांच्या शुभहस्ते हा सोहळा पार पडणार आहे. या कार्यक्रमाला केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरिराजसिंह, महाराष्ट्राचे महसूळ मंत्री चंद्रशेखर बावनकुले तसेच राज्याचे वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
परंपरेला आधुनिक बाजारपेठेची जोड
नागपूर जिल्ह्यातील धापेवाड़ा – कलमेश्वर परिसराला पारंपरिक विणकामाची समृद्ध परंपरा लाभली आहे. पितोपार्जित येथून विणकरांनी आपल्या कौशल्यातून केवळ वस्त्रांची निर्मिती केली नाही, तर या मातीची संस्कृती, परंपरा, कलात्मकता आणि अस्मिता जपली आहे. मात्र, बदलत्या काळात पारंपरिक हातमागाला आधुनिक डिझाइन, ब्रँडिंग, बाजारपेठ आणि ग्राहकांशी थेट जोडण्याची गरज निर्माण झाली आहे. ही गरज ओळखून स्थानिक विणकरांच्या कलेला देश-विदेशातील बाजारपेठ उपलब्ध करून देण्याचा संवेदनशील विचार नितिन गडकरी यांच्या मनात आला.
स्थानिक विणकरांच्या हातातील कौशल्याला नवी दिशा मिळाली
ही वैभवशाली परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचاوی आणि विदर्भातील हातमागाला जागतिक व्याप्ती मिळावी, या उद्देशाने गडकरी यांनी या संकल्पनेला सातत्याने प्रोत्साहन दिले. त्यांच्या मार्गदर्शनातून आणि प्रयत्नांतून धापेवाड़ा टेक्सटाइल उद्योग प्रोड्यूसर कंपनी लिमिटेडच्या माध्यमातून हे स्वप्न आता प्रत्यक्षणात साकार होत आहे.
मुंबईतील मॉडल्सचा फैशन शो
उद्घाटन सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे मुंबईतील सुप्रसिद्ध मॉडल्स धापेवाड़ा टेक्सटाइलच्या साड्या परिधान करून विशेष फॅशन शो सादर करणार आहेत. पारंपरिक हातमागाच्या साड्यांना आधुनिक फॅशनाच्या व्यासपीठावर सादर करून त्यांची गुणवत्ता, सौंदर्य आणि वैशिष्ट्य देशभर पोहोचविण्याचा हा अभिनव प्रयत्न आहे.
महिलांच्या हाताला बळ
धापेवाड़ा टेक्सटाइलचा हा प्रकल्प केवळ उत्पादन किंवा व्यवसायापुरता मर्यादित नसून यामध्ये महिला सक्षमनीकरण आणि रोजगारनिर्मितीचा महत्त्वपूर्ण सामाजिक विचार आहे. स्थानिक तसेच विदर्भातील विणकर महिलांचे कौशल्य अधिक समृद्ध व्हावे, त्यांना आधुनिक तंत्रज्ञान व डिझाइनचे ज्ञान मिळावे आणि त्या आर्थिकदृष्ट्या सक्षम व आत्मनिर्भर व्हाव्यात, यासाठी महिलांना हातमागाचे प्रशिक्षण देण्याचे कार्यही या उपक्रमांतर्गत सुरू करण्यात आले आहे.
परंपरागत कौशल्याला आधुनिक प्रशिक्षणाची जोड मिळाल्यास ग्रामीण आणि स्थानिक महिलांसाठी रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होऊ शकतात. त्याचबरोबर त्यांच्या कुटुंबाच्या आर्थिक स्थैर्याला आणि स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठी चालना मिळू शकते.
पत्रकार परिषदेला कंपनीचे संचालक सुधीर दिवे, राजश्री बापट, दिलीप घोटे, किरण खडगी, दिलीप डाखोले, प्रभु महाराज पराते, गोबिंदराव झोड, नागपूर नागपुरे, मिलिंद बेळेकर, ज्योती मानकर, सोनाली अंबोलीकर, सीमा साब्ळे, रुचीता पराते, रुपेश कुमार, नितिन कुलकर्णी यांची उपस्थिती होती.












