विभागीय आयुक्तांचे अधिकाऱ्यांना निर्देश
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : विभागात खरीप पिकाखाली १८ लक्ष ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप पिकांचे नियोजन करताना भात, सोयाबीन, कापूस व तूर या पिकासह तेलबिया पिकांच्या नियोजनाला प्रोत्साहन देण्याच्या सूचना विभागीय आयुक्त विजयलक्ष्मी बिदरी यांनी दिले आहे.
खरीप पिकांचे नियोजन करताना शेतकऱ्यांना वेळेवर बियाणे खते तसेच विविध बँकांद्वारे कर्ज पुरवठा आवश्यकतेनुसार उपलब्ध होईल, यासाठी जिल्हाधिकारी यांनी जिल्हास्तरावर नियोजन करावे, अशा सूचना बिदरी यांनी दिले.
विभागातील खरीप नियोजना संदर्भात आढावा बैठक बिदरी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. या बैठकीस जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी, पुनर्वसन सह आयुक्त विजया बनकर, विभागीय सहनिबंधक प्रवीण वानखडे, कृषी सहसंचालक उमेश घाडगे तसेच इतर विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
विभागात २३ लाख १२ हजार लागवडीखालील क्षेत्र असून त्या अंतर्गत १८ लाख २५ हजार हेक्टरवर खरीप पिकांचे नियोजन करण्यात आले आहे. या नियोजनामध्ये भंडारा-गोंदिया गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यात ३३ टक्के इटसेल्फ जास्त भात लागवडीचे क्षेत्र आहे, तर ४४ टक्के क्षेत्रात कापूस १४ टक्के क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली जाते.
विभागात मागील वर्षी ११३ टक्के सरासरी पाऊस झाला होता, तर खरीप हंगामात १०३ टक्के पेरणी पूर्ण झाली होती. विभागात कापूस व सोयाबीन तसेच तुरीच्या पिकासोबतच तेल वर्गीय पिकांच्या पिकांच्या क्षेत्रात वाढ व्हावी, या दृष्टीने नियोजन करण्याच्या सूचना करताना बिदरी म्हणाल्या की, भात क्षेत्रात तेलबिया पिकांचा समावेश कसा करता येईल या दृष्टीने नियोजन करावे.
खरीप हंगामामध्ये सोयाबीन पिकाखाली दोन लाख ६१ हजार हेक्टर कापूस पिकाखाली ६८ लाख हेक्टर तर तुरीच्या अंतर्गत एक लाख ८७ हजार क्षेत्रात नियोजन करण्यात आले आहे. खरीप बियाण्यांमध्ये साधारणतः दोन लाख ३७ हजार ३५४ क्विंटलची गरज असून महाबीज व इतर खाजगी कंपन्यांकडे पुरेसे बियाणे उपलब्ध आहे.
खतांचीही मागणी नुसार पुरवठा उपलब्ध होत असून युरिया व डीएपी खतांचा संरक्षित साठा असल्याचे विभागीय कृषी सहसंचालक उमेश घाडगे यांनी यावेळी सांगितले.
हवामान विभागाच्या सूचनेनुसार विभागात केवळ ९२ टक्के पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तसेच दोन पावसातील खंड पडण्याची शक्यता लक्षात घेऊन पिकांच्या संरक्षणाला प्राधान्य देण्याच्या सूचना करण्यात आल्या आहे. अल निनोचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी कापूस पिकाची लागवड करताना सरीवरंबा पद्धतीचा अवलंब करावा, तसेच सोयाबीन साठी बीबीएफ सरीवरंबा पद्धतीनेच पेरणी करावी भात पिकाची पेरणी करताना डी एस आर व एस आर आय पद्धत वापरावी, याबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार येत आहे.
खतांचा काळाबाजार थांबवण्यासाठी तालुकास्तरावर भरारी पथकांची नियुक्ती करावी, तसेच युरियाचा औद्योगिक वापरासाठी उपयोग होत असल्याचे आढळून आल्यामुळे प्रत्येक दुकानांची तपासणी करून काळाबाजार होणार नाही, याची दक्षता घ्यावी. औद्योगिक क्षेत्रात युरियाचा वापर होत असलेल्या उद्योगांची तपासणी करून उपलब्ध असलेले युरिया यांचे सॅम्पल घेऊन तपासणीसाठी पाठवावे, असे निर्देशही बिदरी यांनी दिले.









