लोकवाहिनी न्यूज:नागपूर : बहुस्तरीय एकत्रित प्रयत्न आणि लोकसहभागातून जलसंवर्धन हे जनआंदोलन व्हावे आणि त्यातून शेतकरी समृद्ध व्हावा, अशी अपेक्षा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केली.
पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त ‘नागपूर जलसंवाद २०२६’ या राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मंचावर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर व अॅड. आशिष जयस्वाल, माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार, डेहराडून-उत्तराखंड येथील पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार प्राप्त अनिल प्रकाश जोशी, चित्रकूट-उत्तर प्रदेश येथील पद्मश्री पुरस्कार प्राप्त जल योद्धा उमाशंकर पांडे, सहारनपूर-उत्तर प्रदेश येथील पद्मश्री सेठपाल सिंग, आसाम येथील ‘नॉर्थ ईस्ट इंडिया वॉटर टॉक्स’चे समन्वयक केशव कृष्ण छत्रधारा, नवी दिल्ली येथील ‘सेंटर फॉर वॉटर पीस’चे मुख्य कार्यकारी संचालक संजय कश्यप, कोहिमा-नागालँड येथील जल व पर्यावरण तज्ज्ञ स्वेडेविनो नात्सो, ‘जलसंवाद’चे सूत्रधार जलतज्ज्ञ पिनाकीदास गुप्ता व इतर मान्यवर मंडळी उपस्थित होती.
‘शेतकरी आत्महत्या-मुक्त विदर्भासाठी जलसंवर्धनाचा उपाय’ हा डॉ. वसंतराव देशपांडे सभागृह, नागपूर येथे आयोजित परिषदेत चर्चेचा प्रमुख विषय होता. यावेळी गडकरी म्हणाले की, जलसंवर्धन करून पाण्याचा स्तर वाढला पाहिजे, जेणेकरून सिंचन वाढेल आणि शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकेल. पाणी हे अनेक समस्यांचे समाधान असून यातून विदर्भ शेतकरी आत्महत्यामुक्त होऊ शकतो. ते पुढे म्हणाले की, यात लोकांचा सहभाग आवश्यक आहे. शेतकऱ्यांचा खर्च कमी करायचा असेल तर डिझेलचा खर्च कमी करून फ्लेक्स इंजिनचा वापर केला पाहिजे, तसेच सौर ऊर्जेचा अधिक वापर व्हायला हवा. मनसर येथे शेतकऱ्यांनी तयार केलेल्या बिट्यूमीनपासून रस्ते तयार होत आहेत. नजीकच्या काळात बायो एव्िएशन फ्युएलसाठीही शेतकऱ्यांना योगदान देता येणार आहे, असे त्यांनी सांगितले. सर्व स्तरातून एकत्रित आणि बहुविध प्रयत्न करून जलसंवर्धन करण्याचे आवाहन त्यांनी केले.
यावेळी अनेक जलतज्ज्ञांनी आपल्या कार्याची माहिती दिली. कोहिमा-नागालँड येथील जल व पर्यावरण तज्ज्ञ स्वेडेविनो नात्सो यांनी पारंपारिक ज्ञान आणि विज्ञान यांचे एकत्रीकरण गरजेचे असल्याचे सांगितले. के. के. छत्रधारा यांनी ‘एल निनो’चा प्रभाव कमी करण्याच्या दृष्टीने प्रयत्न होण्याची गरज व्यक्त केली. ‘रिव्हर बेसिन बेस्ड गव्हर्नन्स’ ही संकल्पनाही त्यांनी मांडली.
सहारनपूर-उत्तर प्रदेश येथील पद्मश्री सेठपाल सिंग यांनी अत्यंत कमी पाण्यात शिंगाडा शेती कशाप्रकारे केली जाते यावर प्रकाश टाकला. चित्रकूट-उत्तर प्रदेश येथील पद्मश्री पुरस्कार प्राप्त जल योद्धा उमाशंकर पांडे यांनी जमिनीचा स्तर, मातीचे पोत राखणे आणि गोड पाणी समुद्रात वाहून जाण्यापासून वाचवणे याबाबत आपले विचार मांडले.
डेहराडून-उत्तराखंड येथील पद्मभूषण व पद्मश्री पुरस्कार प्राप्त अनिल प्रकाश जोशी यांनी गडकरी यांनी देशाला रस्त्यांनी जोडले तसेच पाण्यानेही जोडावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. पाणी हा एकटा घटक नसून त्याला जंगल आणि संपूर्ण परिसंस्थेशी जोडणे आवश्यक असल्याचे ते म्हणाले.
यादरम्यान पंढरपूर वॉटर कॉरिडॉरबाबत एक लघुपाट दाखविण्यात आला. अमृत सरोवर, ग्रामीण उद्धार आणि पायाभूत सुविधा विकास यांचा संगम या कॉरिडॉरमधून दिसून येतो.
माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी पूर्ती सिंचन समृद्धी कल्याणकारी संस्थेच्या कार्याचा गौरव केला. ‘तिसरे महायुद्ध पाण्यासाठी होणार’ हे आपण ऐकत आलो आहोत; मात्र ते थांबवण्यासाठी गडकरी उपाय शोधत आहेत, असे ते म्हणाले. जलसंवर्धन क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर काम होण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
मंत्री पंकज भोयर यांनी वर्धा जिल्ह्यातील तामसवाडा पॅटर्नचा उल्लेख केला. गडकरी यांचे विचार आणि योजना अमलात आणण्याचा प्रयत्न करू, असे आश्वासन त्यांनी दिले. प्रफुलदत्त जामदार यांनी आभार प्रदर्शन केले. १९ राज्यातून आलेल्या सहभागींचे त्यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आसावरी गलांडे-देशपांडे यांनी केले.











