सरकारच्या भूमिकेवर जरांगेंचा संताप
लोकवाहिनी न्यूज
जालना : मराठा आंदोलन मोडून काढण्यासाठी सरकारकडून कटकारस्थान सुरू असल्याचा थेट आरोप मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांनी केला. उपोषणाला १२ दिवस झाले असून, त्यांनी राज्य सरकार, मंत्री आणि सत्ताधारी आमदारांवर अत्यंत कडक शब्दांत तोफ डागली.
शासकीय बैठका आणि सरकारमधील काही मंत्र्यांच्या भूमिकेवरही जरांगे यांनी नाराजी व्यक्त केली. सरकारने आता हार मानावी, असे ते म्हणाले. काही नेत्यांच्या शब्दावर विश्वास ठेवून आपण यापूर्वी सलाईन घेतले होते. मात्र आता मराठा आंदोलन कमकुवत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचा त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही जरांगे पाटील यांनी गंभीर आरोप केले. राज्यात दंगल घडवण्याचा प्रयत्न झाला आणि त्यातून काही अनुचित प्रकार घडले, तर त्याला एकनाथ शिंदे जबाबदार असतील, असा दावा त्यांनी केला. सरकारमधील सर्व मंत्री आणि आमदार एकत्र आले तरी मराठा समाजाच्या आंदोलनाला ते रोखू शकत नाहीत, असेही जरांगे म्हणाले.
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यावरही जरांगे यांनी टीका केली. आंदोलनासाठी मोठ्या प्रमाणात लोक आणण्याबाबत करण्यात आलेल्या वक्तव्यावर त्यांनी आक्षेप घेतला. मराठा समाज आता सरकारच्या भूमिकेला योग्य उत्तर देईल, असा इशाराही त्यांनी दिला. मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सरकारने आता वेळ दवडू नये, अशी मागणी जरांगे पाटील यांनी केली. आरक्षणाचा मुद्दा संपवण्याचा प्रयत्न झाला तरी हा प्रश्न संपणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, सरकारला अंतिम इशारा देताना जरांगे पाटील यांनी १२ तारखेपर्यंत मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, अशी मागणी केली. अन्यथा मुंबईकडे कूच करण्याचा निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी सांगितले. आमचा संयम सुटल्यास मराठा समाजाची ताकद सरकारला कळेल, असा इशाराही त्यांनी दिला. अंतरवाली सराटी येथील उपोषणामुळे मराठा आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आला असून, सरकार आणि आंदोलकांमधील तणाव वाढण्याची शक्यता आहे.










