सम्मेलनाध्यक्ष डॉ. गणोरकर, स्वागताध्यक्ष फडणवीस
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळ, मुंबई यांच्या अनुदानातून स्त्री शिक्षण प्रसारक मंडळद्वारे संचालित महिला महाविद्यालय, नागपूर यांच्या वतीने सहकार्याने नागपूर जिल्हा महिला साहित्य संमेलनाचे येत्या, २० व २१ नोव्हेंबर दरम्यान आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्ष प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. प्रभा गणोरकर असून स्वागताध्यक्ष स्त्री शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष रवींद्र फडणवीस आहेत.
महिला महाविद्यालय, १५२, गणेशनगर येथे होणाऱ्या या दोन दिवसीय संमेलनाचे उद्घाटन शुक्रवार, २० नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता होईल. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर उपस्थित राहणार आहेत. तसेच महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य श्रीपाद अपराजित, डॉ. प्रमोद मुनघाटे, प्रकाश होळकर आणि महिला महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. रीता सोनटक्के यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
उद्घाटन सोहळ्यानंतर ‘सेतू की संकट?’ या विषयावर पहिला परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. अध्यक्षस्थानी वसुंधरा काशिकर (पुणे) राहणार असून, रेणुका देशकर, वृषाली देशपांडे, अश्विनी जांभेककर-पिटळे, मनीषा रिठे आणि क्षिप्रा मानकर सहभागी होणार आहेत. त्यानंतर ‘मी अलीकडे वाचलेल्या स्त्रियांच्या कविता’ या विषयावर परिसंवाद होईल. सुनील यावलीकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात डॉ. अमृता इंदुरकर, माधवी भट, संघमित्रा खंदारे आणि मनोज मोहिते सहभागी होतील. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी, २१ नोव्हेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता ‘समाजमाध्यमे : जोखीम आणि गरज’ या विषयावर परिसंवाद होणार आहे. अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. अजय देशपांडे राहणार असून प्रा. डॉ. संदीप तुंडूरवार, मोहिनी मोडक, सोनाली नक्षिणे आणि ज्ञानेश्वर गटकर सहभागी होतील. यानंतर कथा वाचन आणि स्वरचित कविता वाचन सत्र आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पौर्णिमा तायडे व कुरखेड्याचे संगीता ठलाल यांची प्रमुख उपस्थिति असणार आहे.
दुपारी २.१५ वाजता ‘बोली साहित्यातील लेखिकांचे योगदान’ या विषयावर प्रा. डॉ. काशनाथ बऱ्हाटे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद होईल. यात प्रा. डॉ. राजकुमार मुसणे, प्रा. डॉ. रावसाहेब काळे आणि शैलजा गावंडे यांचा सहभाग राहील.
संमेलनाचा समारोप दुपारी ४.१५ वाजता प्रसिद्ध साहित्यिक प्रा. डॉ. वसंत आबाजी डहाके यांच्या अध्यक्षतेखाली होणार असून, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. प्रतिभा इंगोले यांची उपस्थिती राहणार आहे. या दोन दिवसीय संमेलनातून महिला साहित्यिकांना संवाद, विचारांची देवाणघेवाण आणि साहित्यिक अभिव्यक्तीसाठी एक समृद्ध व्यासपीठ उपलब्ध होणार असून, साहित्यप्रेमींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
















