१२५ हून अधिक किल्ल्यांचे होणार परीक्षण
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गड-किल्ल्यांचा गौरवशाली इतिहास, शौर्य आणि स्थापत्यवैभव नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीतर्फे आयोजित ‘खासदार शिव किल्ले स्पर्धा २०२६’च्या परीक्षण परिक्रमेला गुरुवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला.
यंदा या स्पर्धेत १२५ हून अधिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती सहभागी झाल्या असून, परीक्षकांच्या तीन चमू या परीक्षण परिक्रमेदरम्यान शहरातील शालेय व खुल्या गटांतर्गत विविध ठिकाणी साकारलेल्या किल्ल्यांची पाहणी करून त्यांचे परीक्षण करणार आहेत. परीक्षकांच्या चमूत सुषमा ओझा, सुवर्णा कडलकर, अंकुश नेवलकर, कस्तुरी बावणे, शांतनू इंगळे, अभिजीत जाधव, मनिषा नागपुरे, शीतल वैद्य, रसिका रिसलदार, डॉ. आनंद मांजरखेडे, डॉ. श्रीकांत पारखी, प्रवीण योगी, आशीष येरंडे यांचा समावेश आहे.
गडकरी यांनी यावेळी या उपक्रमाचे कौतुक केले. अशा स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाविषयी अभिमान आणि गड-किल्ल्याविषयी आकर्षण निर्माण होण्यास मदत होते. नव्या पिढीला आपल्या समृद्ध ऐतिहासिक वारशाची ओळख करून देण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व असल्याचे त्यांनी नमूद केले. किल्ल्यांच्या माध्यमातून इतिहास, संस्कृती आणि परंपरांचे जतन करण्याचा हा उपक्रम स्तुत्य असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी नगरसेवक बंडू राऊत, श्रीकांत आगलावे, हेमंत बरडे, स्पर्धेचे संयोजक अतुल गुरु, सहसंयोजक संजय बंगाले, हेमंत देशपांडे, जे. एस. बावनकर, मंगेश बारसागडे, खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे कोषाध्यक्ष प्रा. राजेश बागडी, अविनाश घुशे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मध्यवर्ती कारागृहात शिवप्रताप दिन उत्साहात
दरम्यान, १० नोव्हेंबर हा शिवप्रताप दिन असल्याने या दिवसाचे औचित्य साधून नागपूर मध्यवर्ती कारागृहात विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. खासदार सांस्कृतिक महोत्सव समितीचे सचिव जयप्रकाश गुप्ता यांनी कारागृहात बंदिवानांनी साकारलेल्या किल्ल्याचे पूजन करून शिवप्रताप दिन साजरा केला. नागपूर मध्यवर्ती कारागृहातील बंदिवानांनी जलदुर्ग प्रकारातील ऐतिहासिक सिंधुदुर्ग किल्ल्याची अतिशय सुंदर, आकर्षक आणि भव्य प्रतिकृती कारागृह अधीक्षक वैभव सु. आगे आणि दीपा वै. आदे यांच्या मार्गदर्शनत साकारली आहे.
















