मागील निवडणुकीत वंजारींकडून जोशींचा पराभव
विजय गावंडे
नागपूर : महाराष्ट्र विधान परिषदेच्या नागपूर पदवीधर मतदारसंघासह राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यानुसार नागपूर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार असून, मतदानाची वेळ सकाळी ८ ते सायंकाळी ४ अशी राहणार आहे.
१९७८ मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे वडील गंगाधरराव फडणवीस यांनी या मतदारसंघाची निवडणूक जिंकली. त्यानंतर नितीन गडकरी यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व मिळवून विधान परिषद गाठली. १९९०, १९९६ आणि २००२ मध्ये गडकरी या मतदारसंघातून विधानपरिषदेवर निवडून गेले. २००२ मध्ये गडकरी यांच्यासमोर प्रतिस्पर्धी उमेदवाराचे नसल्याने ते बिनविरोध निवडून आले. २००८ मध्ये त्यांनी निवडणूक जिंकली. ही निवडणूक विशेष ठरली होती. गडकरी यांच्याविरोधात शिक्षण क्षेत्राशी जुळलेले काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस समर्थित बबनराव तायवाडे यांचे मोठे आव्हान होते. त्यावेळी मतदारसंघात सुमारे १.८ लाख पदवीधर मतदार होते. मात्र, गडकरी यांनी निवडणूक जिंकत आपला बालेकिल्ला कायम राखला होता. २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत विजयी झाल्यानंतर त्यांनी विधान परिषद सदस्यत्व सोडले आणि त्यानंतर त्यांचे कट्टर समर्थक अनिल सोले या मतदारसंघातून विजयी झाले.
परंतु २०२० मध्ये झालेल्या पदवीधर मतदारसंघातून निवडणुकीत तब्बल ५५ वर्षांनंतर भाजपचा हा गड खालसा पडला. काँग्रेस उमेदवार अॅड. अभिजित वंजारी यांची ताकद कमकुवत असताना त्यांनी माजी महापौर राहिलेले संदीप जोशी यांचा तब्बल यांचा १८ हजार ७१० च्या मताधिक्याने दणदणीत पराभव केला. त्यावेळी संदीप जोशी यांना पक्षातर्फेच दगाफटका बसल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर मागील ५ वर्षांपासून भाजपचा एकही इच्छुक आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसाठी बाहेर पडल्याचे दिसून आलेले नाही. जर पक्षातर्फे दगाफटका होत असेल, तर बळीचा बकरा का व्हायचे असे इच्छुकांना वाटणे साहजिक आहे.
दुसरीकडे अभिजित वंजारी यांनी २०२०ची निवडणूक जिंकल्यानंतर स्वस्थ बसून राहिलेले नाही. त्यांनी आपला जनसंपर्क अधिक मजबूत केल्याचे दिसत आहे. नागपूरसह चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया जिल्ह्यातील महाविद्यालयांना भेट देऊन शिक्षकांशी चर्चेचा सपाटा लावला. दररोज दौरे करून त्यांनी आपला जनसंपर्क वाढविला आहे. उच्च शिक्षित मतदारांना आपल्या बाजूने करण्याचे कसब ते ओळखून आहे. आणि हीच त्यांची जमेची बाजू आहे. तर आपने अध्यापही उमेदवाराची चाचपणीही केल्याचे दिसत नाही. भाजपमध्ये इच्छुकांची संख्या मोठी असली तरी २०२० च्या निवडणुकीचा अनुभव लक्षात घेता कुणीही पुढे आलेला नाही.
उमेदवारांची दमछाक होणार
नागपूर पदवीधर मतदारसंघात नागपूरसह वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांचा समावेश आहे. फार मोठ्या भौगोलिक विस्तारामुळे या मतदारसंघात प्रचार करताना उमेदवारांची प्रचंड दमछाक होणार आहे. आगामी निवडणुकीसाठी भाजपचे समन्वयक म्हणून ज्येष्ठ नेते प्रा. गिरीश देशमुख यांची नियुक्ती केली आहे. ते आता लोकप्रतिनिधी, पदाधिकारी आणि मतदारांशी कशाप्रकारे समन्वय राखणार यावर सर्व अवलंबून असणार आहे.














