नागपुरातील चिल्लर कारवाईतून मोठे मासे गळाला लागेना
प्रसन्न जकाते
नागपूर : शहर पोलिसांनी ड्रग्सच्या विरोधात मोहीम सुरू केली. या मोहिमेचा प्रचंड गाजावाजा करण्यात आला. परंतु या मोहिमेनंतर नागपुरात अमली पदार्थांना आळा बसण्यापेक्षा त्यांचे दर वाढले आहेत. पूर्वी एक हजार रुपयांना मिळणारे एमडी अर्थात छोटी रजनीगंधा पोलिसांच्या मोहिमेनंतर आता दीड ते दोन हजार रुपये प्रति ग्रॅम দराने नागपुरात विकली जात आहे.
विशेष बाब म्हणजे नागपुरात मोठ्या प्रमाणावर गांजा, एमडी डोडा पावडर येत असताना पोलिसांनी कारवाई तीन ग्रॅमपर्यंतच मर्यादित आहे. आरोपींकडून हा चिल्लर साठा पकडला जातो. मात्र हा साठा नेमका नागपुरात येतो कुठून, याचे होलसेलर्स कोण आहेत? यापर्यंत पोलिसांचा तपास कधी पोहोचतच नाही. त्यामुळे पोलिसांची अँटी ड्रग्स विरोधी कारवाई केवळ दोन ग्रॅम, तीन ग्रॅम पर्यंतच मर्यादित आहे का, की मर्यादीत ठेवली जाते, यावरून शंकाकुशंका उपस्थित होऊ लागली आहे.
रामदासपेठ, वायसीवायई कॉलेजकडील परिसर, वानाडोंगरी, कमाल चौक, सदर, जरीपटका आदी कोणकोणत्या भागात कशी अमली पदार्थांची विक्री होते, याची पूर्ण कुंडलीच जगजाहीर आहे. परंतु पान मसाला असलेली रजनीगंधा क्विंटलने पकडली जात आणि खरा ‘स्टफ’ असलेली रजनीगंधा मात्र तीन ग्रॅमच्या पलीकडे आजही जाऊ शकलेली नाही. त्यामुळे लाखांवर तरुणई असलेल्या नागपूर शहरात केवळ दोन, तीन ग्रॅमच एमडी विकली जाते यावर बालवाडीत शिकणाऱ्या मुलाचा तरी विश्वास बसेल का? असा प्रश्न आता विचारला जात आहे.
अशी वाढली विक्री (आठ महिन्यातील आकडेवारी)
| अमली पदार्थ | २०२५ | २०२६ | तफावत |
| गांजा |
३३४.१०९ किलो |
९३९.९५६ किलो |
२६ टक्के वाढ |
| एमडी |
२.२६० ग्रॅम |
१०.३२० ग्रॅम |
१८१ टक्के वाढ |
पोलिस काय म्हणतात?
नागपूर शहर पोलिसांनी प्रकाशित केलेल्या आकडेवारीनुसार गांजा आणि एमडी तस्करीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. एकूण अमली पदार्थांच्या प्रकरणांमुळे ३१ टक्क्यांवर वाढ झाली आहे. हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील आकडा आहे. मात्र गांजा, एमडी, डोडा पावडर आणि इतर अमली पदार्थांचा खप पाहिला तर ही उलाढाल कोट्यवधी रुपयांची आहे. त्यामुळे पोलिसांनी कारवाई आता तीन ग्रॅमच्या पलीकडे नेण्याची गरज निर्माण झाली आहे.














