प्रवीण तोगडियांनी राज्य सरकारला घेरले
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महाराष्ट्रावर यंदा दुष्काळाचे सावट असून, त्याचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसत आहे. पिकांचे नुकसान, आर्थिक संकट आणि जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न यामुळे शेतकरी होरपळत आहेत. या परिस्थितीत शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण वाढण्याची भीती असून, त्या रोखण्यासाठी राज्य सरकारने तातडीने प्रभावी उपाययोजना कराव्यात. कुंभमेळ्यावर खर्च करताना त्याच धर्तीवर शेतकऱ्यांच्या मदतीचीही चिंता करा. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत देताना तांत्रिक अडचणींचे कारण पुढे न करता सरसकट मदत द्यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे संस्थापक डॉ. प्रवीण तोगडिया यांनी येथे बोलताना केली.
कधीकाळी भारतीय जनता पक्षावर स्तुतीसुमने वाहणारे डॉ. प्रवीण तोगडिया यांनी नागपूरमध्ये पत्रकार परिषदेत कुंभमेळावा आणि महाराष्ट्रातील दुष्काळावरून राज्य सरकारला घेरले. नाशिक येथे कुंभमेळ्याचे आयोजन होणार असून, त्यासाठी सरकारकडून मोठ्या प्रमाणावर तयारी आणि खर्च केला जाणार आहे. मात्र, कुंभमेळ्याच्या नियोजनात शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होता कामा नये. कुंभमेळ्याची जशी चिंता सरकारला आहे, तशीच चिंता शेतकऱ्यांच्या परिस्थितीचीही असायला हवी. धार्मिक आयोजनांबरोबरच अन्नदात्याच्या जगण्याचा प्रश्नही सरकारने तेवढ्याच गांभीर्याने हाताळावा, असे तोगडिया म्हणाले.
दुष्काळामुळे राज्यातील शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. अनेक शेतकऱ्यांना आपल्या जनावरांची विक्री करण्याची वेळ आली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मदत करण्याबरोबरच पशुधन वाचवण्यासाठीही सरकारने आतापासून नियोजन करणे आवश्यक आहे. जनावरांसाठी चाऱ्याची उपलब्धता हा गंभीर प्रश्न बनू शकतो. त्यासाठी इतर राज्यांची मदत घेऊन चाऱ्याची व्यवस्था करावी, अशी सूचना तोगडिया यांनी केली. दुष्काळग्रस्तांना मदत देताना विविध तांत्रिक निकष आणि अडचणींचा आधार घेतला जातो. परिणामी, प्रत्यक्ष गरजू असलेल्या अनेक शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित राहावे लागते. अशा परिस्थितीत तांत्रिक कारणांमुळे मदत रोखण्याऐवजी सरसकट मदत देण्याची भूमिका सरकारने घ्यावी, असेही तोगडिया म्हणाले. संघटनेच्या कार्याचा विस्तार होत असून, शेकडो लोक संघटनेशी जोडले जात आहेत. नागरिकांना मदत मिळावी यासाठी हिंदू हेल्पलाइन सुरू करण्यात आली आहे. या हेल्पलाइनच्या माध्यमातून नागरिकांना चोवीस तास मदत मागता येणार आहे. गरजूंना आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय ‘हनुमान चालीसा केअर सेंटर’ सुरू करण्यात आले आहे. या केंद्राच्या माध्यमातून विविध आजारांबाबत तपासणी आणि उपचारांची सुविधा उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.













