लोकवाहिनी न्यूज
नागपुर : महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स एसोसिएशनच्या अध्यक्षपदी महाराष्ट्र ऑलिम्पिक एसोसिएशनचे वरिष्ठ उपाध्यक्ष तथा माजी आमदार संदीप जोशी यांची बिनविरोध निवड झाली आहे.
संघटनेची २०२६ ते २०३० या कालावधीसाठीची कार्यकारिणी निवड प्रक्रिया बुधवार, ९ सप्टेंबर रोजी सौंदर्य गार्डन, वाकड, पुणे येथे पार पडली. यावेळी सर्वसाधारण सभा झाल्यानंतर निवडणूक बिनविरोध पार पडली.
महाराष्ट्र बॉडी बिल्डर्स एसोसिएशनला महाराष्ट्र ऑलिम्पिक एसोसिएशन तसेच महाराष्ट्र राज्य क्रीडा परिषद आणि महाराष्ट्र शासनाची मान्यता आहे. तसेच या राज्य संघटनेला इंडियन बॉडी बिल्डिंग अँड फिटनेस फेडरेशनची मान्यता असून, राष्ट्रीय पातळीवर एशियन फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशन आणि इंटरनेशनल फिटनेस अँड बॉडी बिल्डिंग फेडरेशन, मॅड्रिड, स्पेन यांचीही मान्यता आहे.
यापूर्वी सर्वश्री पद्मसिंह पाटील, पुण्याचे माजी खासदार रामकृष्ण मोरे, नामदेवराव मोहिते आणि मावळते अध्यक्ष म्हणून आमदार पहेलवान महेशदादा लांडगे यांनी या पदाचा कार्यभार सांभाळला आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष संदीप जोशी यांच्या रूपाने पहिल्यांदा हा बहुमान विदर्भाला प्राप्त झाला आहे.
नवनिर्वाचित कार्यकारिणीच्या निवडणुकीत वरिष्ठ वकील अॅड. संभाजी पानखेडे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली.
दरम्यान, संघटनेचे सरचिटणीस डॉ. संजय चंद्रकांत मोरे यांनी संदीप जोशी यांच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवडीबद्दल अभिनंदन केले आहे. राज्यातील शरीरसौष्ठव क्षेत्राला अधिक व्यापक व्यासपीठ मिळवून देण्यासाठी तसेच खेळाडूंच्या विकासाला चालना देण्यासाठी त्यांच्या नेतृत्वाचा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. याप्रसंगी सर्वश्री राजेश सावंत, अभिषेक कारीनवार यांच्यासह राज्याच्या २७ जिल्ह्यातून जिल्हा संघटनांचे प्रतिनिधी, शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू, संघटक, राष्ट्रीय पंच उपस्थित होते.
निवडीनंतर संदीप जोशी यांनी सांगितले की, महाराष्ट्रातील शरीरसौष्ठव क्षेत्राला अधिक सक्षम आणि व्यापक व्यासपीठ मिळवून देणे, खेळाडूंना आवश्यक सुविधा व संधी उपलब्ध करून देणे तसेच राज्यातील गुणवंत शरीरसौष्ठवपटूंना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रोत्साहन देणे, हे आपले प्रमुख उद्दिष्ट राहील. संगठन्यातील सर्व पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू आणि जिल्हा संघटनांना सोबत घेऊन शरीरसौष्ठव खेळाच्या विकासासाठी प्रामाणिकपणे कार्य करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.













