मनपाची वाहन सुविधा नाकारून इलेक्ट्रिक बसने प्रवास
लोकवाहिनी न्यूज:नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक तणावाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांना इंधनाची बचत करण्याचे आवाहन केले आहे. जगभरात पेट्रोल आणि डिझेल अत्यंत महाग झाले आहे, त्यामुळे इंधनाची बचत करणे आणि पेट्रोल व डिझेल खरेदीवर खर्च होणारे परकीय चलन वाचवणे ही आपली जबाबदारी असल्याचे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. याशिवाय मोदींनी सोने खरेदी करू नये, राष्ट्रीय कर्तव्य म्हणून जबाबदारी पार पाडावी असे आवाहन केले आहे. मोदींनी केलेल्या आवाहनांना आता भाजप नेते कसा प्रतिसाद देणार असा प्रश्न पडला होता. यावर आता भाजप नेते खाजगी वाहना ऐवजी सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा वापर करायला लागल्याचे दिसून येत आहे. नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी यांनी एक व्हिडीओ समाज माध्यमावर व्हायरल केला.
नागपूर हे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघासाठी महत्त्वाचे केंद्र मानले जाते. त्यामुळे पंतप्रधानांच्या आवाहनावर स्थानिक नेतृत्व काय भूमिका घेते, याकडे नागपूरकरांचे लक्ष लागले होते. महापौर नीता ठाकरे यांनी इंधन बचतीसाठी ऑनलाइन बैठकीवर भर देण्याचा निर्णय जाहीर केला. स्थायी समिती सभापती शिवानी दाणी यांनी सोन्याच्या ऑनलाइन गुंतवणुकीचा हप्ता बंद केल्याचे सांगत प्रस्तावित विदेश दौरा रद्द केल्याचेही स्पष्ट केले.दुसरीकडे काही नेत्यांनी स्वतःच्या कृतीपेक्षा नागरिकांनीच इंधन बचतीसाठी पुढाकार घ्यावा, असा सल्ला दिला. भाजप प्रदेश उपाध्यक्ष डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी नागरिकांनी पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
भाजप महिला आघाडीच्या शहराध्यक्षा दिव्या धुरडे यांनीही नागरिकांनी बचतीची सवय अंगीकारावी, असे मत व्यक्त केले. शिवानी दाणी यांनी व्हिडीओ प्रसारित करत यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर मेट्रोने प्रवास करत असल्याचे सांगितले. या माध्यमातून आपण पेट्रोल बचत करणार असल्याचे त्यांनी सांगितले. लोकांनी याप्रमाणे पेट्रोलची बचत करावी असे आवाहनही त्यांनी याद्वारे केले. त्यांनी सुरुवातीला मेट्रोने प्रवास केला. नियमित वेळेपेक्षा अर्धा तास आधी घरून निघून प्रवास सुरू केल्याचे त्यांनी सांगितले. महापालिका कार्यालय गाठल्याचे सांगितले, लोकांनीही बचतीची सवय लावावी असेही त्या म्हणाल्या.







