सरसंघचालक डॉ. भागवत यांची प्रमुख उपस्थिती
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : ‘रुग्ण सेवा हीच नारायण सेवा’ हा विचार प्रत्यक्षात आणत समर्पण फाउंडेशन, नागपूर गेल्या २५ वर्षांपासून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांच्या नातेवाइकांना निःशुल्क भोजन व निवासासह विविध सेवा पुरवत आहे. वर्ष २००१ मध्ये अवघ्या १०० लोकांच्या भोजन व्यवस्थेपासून सुरू झालेला हा सेवायज्ञ आज व्यापक स्वरूपात विस्तारला आहे.
संस्थापक हनुमान प्रसाद राठी यांच्या पुढाारातून सुरू झालेल्या या सेवाकार्यात आज समर्पण भवनाच्या माध्यमातून गरजूसाठी भोजन, निवास, फळे, कपड़े, चप्पल, औषधे तसेच गरजेनुसार रक्त उपलब्ध करून देण्यासाठी सहकार्य केले जाते. मेडिकल चौकातील राजाबाक्षा हनुमान मंदिराजवळील सुमारे ११ हजार चौरस फुतांच्या तीन मजली समर्पण भवनातून हा उपक्रम राबविला जातो. कोरोना काळातही संस्थेने आपली सेवा अखंडित सुरू ठेवली.
या सेवाकार्याला २५ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त शनिवार, ७ नोव्हेंबर रोजी सायंकाली ५.३० ते ७.३० या वेळेत समर्पण भवन, मेडिकल चौक येथे रजत जयंती सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक परमपूज्यनीय डॉ. मोहन भागवत प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. नागपुरातील विविध क्षेत्रातील सुमारे ५०० मान्यवरांनाही निमंत्रित करण्यात आले आहे. उपचारासाठी येणाऱ्या कोणत्याही गरजू रुग्णाच्या नातेवाіकांना भोजन व निवासाची चिंता भासू नये, हा संस्थेचा सेवाभावी संकल्प आहे.
पत्रकार परिषदेत संस्थापक हनुमान प्रसाद राठी, जयप्रकाश राठी, नारायण राठी, गोविंद राठी, प्रेमप्रकाश दुबे, आनंद जोशी, चंद्रशेखर गलगलिकर आणि यतींद्र नाडकर्णी यांनी संस्थेच्या २५ वर्षांच्या सेवाकार्याची माहिती दिली.













