पंतप्रधानांच्या आवाहनाला जिल्हा परिषदेचा प्रतिसाद
लोकवाहिनी न्यूज,नागपूर : अमेरिका-इराण युद्धामुळे इंधन पुरवठ्यावर मोठा परिणाम होणार आहे. महागाई दर वाढण्याची शक्यता आहे. यासाठी खबरदारी म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सोने खरेदीवर निर्बंध लावण्यासोबत इंधन बचतीचे आवाहन केले आहे. त्याला शासकीय यंत्रणेकडून प्रतिसाद देण्यात येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्रालय दुचाकीवर गाठले. जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांनी प्रत्येक सोमवारी सार्वजनिक वाहनाद्वारे कार्यालयात येण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) हे सुद्धा यात मागे राहणार नाहीत.
नागपूर जिल्हा परिषदेच्या कर्मचाऱ्यांची आभासी बैठकीद्वारे व समाज माध्यमातून इंधन बचतीविषयी नुकतीच चर्चा करण्यात आली. या चर्चेनुसार जिल्हा परिषदेच्या सर्व कर्मचाऱ्यांनी इंधन बचतीसाठी स्वयंस्फूर्तीने सामान्य परिस्थिती होईपर्यंत आठवड्यातल्या प्रत्येक सोमवारी कर्तव्यस्थळी मेट्रो, सार्वजनिक बस, विद्युत वाहने व सार्वजनिक वाहनातून प्रवास करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. सोहन चवरे यांनी दिली. या उपक्रमाची जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनाही माहिती देण्यात आली. त्यांनी सुद्धा सोमवारी १८ मे रोजी निवास ते कर्तव्य स्थळापर्यंत पायी येणार असल्याचे जाहीर केले, यामुळे कर्मचारी राबवत असलेल्या उपक्रमास आणखी बळ मिळाले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कमलकिशोर फुटाणे यांची भेट घेऊन जिल्हा परिषदेचे कर्मचारी राबवीत असलेल्या उपक्रमाची माहिती दिली असता त्यांनी या उपक्रमाचे कौतुक केले. अधिकारी व कर्मचारी मिळून इंधन बचतीचा उपक्रम राबवित असलेली नागपूर जिल्हा परिषद ही पहिली ठरणार असल्याचा दावा कर्मचाऱ्यांचा आहे. ‘आजची बचत उद्याचे उज्ज्वल भविष्य’, ‘एक दिवस देशासाठी’ या ब्रीद वाक्याप्रमाणे कर्मचारी स्वयंस्फूर्तीने आठवड्यातील एक दिवस सोमवारी पेट्रोल अथवा डिझेलचे वाहन न चालविता सार्वजनिक वाहनाने प्रवास करणार असल्याचे सांगण्यात आले.
या बैठकीत अनेक कर्मचाऱ्यांनी दररोज सार्वजनिक वाहनाने प्रवास करण्याचा निर्धार व्यक्त केला. या उपक्रमात जिल्हा परिषद, पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्रे, पशु दवाखाने, जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा अन्य आस्थापनेवरील ८५०० कर्मचारी सहभागी होणार आहेत. सोमवार १८ मे पासून हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.








