लोकवाहिनी न्यूज
नागपूर : एनकेपी साळवे वैद्यकीय महाविद्यालय व लता मंगेशकर हॉस्पिटल, हिंगणा रोड, नागपूर येथे एक अत्यंत गुंतागुंतीची हृदय शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडली. या शस्त्रक्रियेमुळे चिमूर येथील ३५ वर्षीय उषा झोडें यांना नवजीवन मिळाले आहे. त्या मायट्रल स्टेनोसिस विथ एओर्टिक व्हॉल्व्ह रिगर्जिटेशन या गंभीर हृदयरोगाने त्रस्त होत्या. या आजारामुळे हृदयातील दोन प्रमुख झडपांवर गंभीर परिणाम झाला होता.
सविस्तर तपासण्या व निदानानंतर हृदयरोग तज्ज्ञांच्या चूमने डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या शस्त्रक्रियेमध्ये मायट्रल व एओर्टिक या दोन्ही झडपांचे प्रत्यारोपण करण्यात आले. ही अत्यंत जटिल शस्त्रक्रिया लता मंगेशकर हॉस्पिटलचे प्रख्यात कार्डिओव्हॅस्कुलर अँड थोरॅसिक सर्जन डॉ. निकुंज पवार आणि त्यांच्या चमूने यशस्वीरीत्या पार पाडली. भूलतज्ज्ञ डॉ. अजय पाटेकर व डॉ. रवी निखाडे यांनी शस्त्रक्रियेदरम्यान रुग्णाची अत्यंत काळजीपूर्वक देखरेख केली. तसेच सर्जरी निवासी डॉक्टर डॉ. व्रषाली जाधव, ज्योती नांदुरकर सिस्टर आणि परिचारिकांनी शस्त्रक्रियेच्या यशात महत्त्वपूर्ण योगदान दिले.
डबल व्हॉल्व्ह रिप्लेसमेंट ही ओपन हार्ट सर्जरीची अत्यंत विशेष आणि गुंतागुंतीची प्रक्रिया असून, एकापेक्षा अधिक हृदय झडपा गंभीररीत्या निकामी झालेल्या रुग्णांवर ती केली जाते. या शस्त्रक्रियेदरम्यान खराब झालेल्या मायट्रल व एओर्टिक झडपा काढून त्यांच्या जागी कृत्रिम झडपा बसविण्यात आल्या. त्यामुळे हृदयातील रक्तप्रवाह सुरळीत होऊन हृदयाची कार्यक्षमता लक्षणीयरीत्या सुधारली.
विशेष म्हणजे, उषाताई झोडे या गेल्या तीन वर्षांपासून चालताना तसेच दैनंदिन साध्या हालचाली करतानाही तीव्र श्वास लागण्याच्या त्रासाने ग्रस्त होत्या. या तक्रारीमुळे त्यांनी लता मंगेशकर हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला होता.
संपूर्ण उपचार व शस्त्रक्रिया आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेअंतर्गत पूर्णपणे मोफत करण्यात आली. त्यामुळे रुग्णाला कोणताही आर्थिक भार न पडता अत्याधुनिक हृदय उपचारांचा लाभ मिळाला.









