बिनविरोध निवडणुकांसाठी बावनकुळेंचा काँग्रेसला सल्ला
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : महायुतीकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये स्पष्ट संख्याबळ असून विदर्भातील पाचही जागांसह राज्यातील सर्व १७ जागांवर महायुतीचा विजय होणार आहे. संख्याबळाचा विचार करा आणि निवडणुकीतून माघार घ्या, पराभूत तर होणारच आहात. मग उगीच इंधन आणि पैशांचा अपव्यय कशाला करता? असा सल्ला महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसला आणि त्यांच्या घटक पक्षांना दिला.
चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपूर विमानतळावर प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवसाच्या पार्श्वभूमीवर बोलताना बावनकुळे म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अपक्ष उमेदवारांशी चर्चा केली असून, महायुतीतील बहुतांश अपक्ष उमेदवार आपले अर्ज मागे घेतील. ज्या ठिकाणी काँग्रेसची स्थिती स्पर्धात्मक नाही, त्या ठिकाणी काँग्रेसनेही बिनविरोध निवडणुकीचा विचार करावा, असे आवाहन त्यांनी केले.
ही निवडणूक जनतेची नसून संख्याबळावर आधारित असल्याने ज्या पक्षाकडे अधिक सदस्य आहेत, त्याच पक्षाचा विजय होणार आहे. नागपूर, भंडारा, अमरावतीसह राज्यातील सर्व १७ जागांवर महायुती विजयी होईल. महाविकास आघाडीने वास्तववादी भूमिका घेतल्यास महाराष्ट्रात काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका होऊ शकतात.
महायुतीतील बंडखोरीबाबत विचारले असता, आमचे कार्यकर्ते पक्ष नेतृत्वाचे ऐकतील आणि बंडखोरीची शक्यता अल्प असल्याचे बावनकुळे यांनी स्पष्ट केले. अब्दुल सत्तार यांच्याशी नुकतीच भेट झाल्याचे सांगत, काही मतभेद असले तरी मनभेद नसल्याचे त्यांनी नमूद केले. यवतमाळमध्ये काँग्रेसच्या उमेदवारीबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, उमेदवारी विजयाची शक्यता लक्षात घेऊन निर्णय घेत असतात. विदर्भातील पाचही जागांवर महायुतीचा विजय होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना बावनकुळे म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गरीब कल्याणाला प्राधान्य देत देशाची अर्थव्यवस्था मजबूत केली आहे. त्यामुळे देशातील आर्थिक परिस्थितीबाबत राहुल गांधी यांनी केलेली टीका वास्तवापासून दूर असून ती हास्यास्पद आहे.
विप्लव बाजोरिया प्रकरणाबाबत बोलताना त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास व्यक्त केला. उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय जे निर्णय देतील ते संबंधित आयोगाला मान्य करावे लागतील. या प्रकरणात सरकारने कोणताही हस्तक्षेप केलेला नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.
कळमना बाजारचे महत्त्व वाढणार
कळमना बाजार समिती ही आशियातील सर्वात मोठी बाजार समिती असून राज्य सरकारने विशेष कायद्याद्वारे तिला राष्ट्रीय स्तरावरील बाजार समितीचा दर्जा दिला आहे, असे बावनकुळे यांनी सांगितले. या निर्णयामुळे कळमना बाजार समितीमार्फत देश-विदेशातील बाजारपेठांमध्ये मालाची निर्यात सुलभ होणार असून विदर्भ व नागपूरच्या आर्थिक विकासाला चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.











