लातूरमधील परिस्थिती गंभीर, बांधावर धायमोकलून रडला शेतकरी
लोकवाहिनी न्यूज
लातूर : पावसाने दीर्घ खंड दिल्याने मराठवाड्यातील खरीप हंगाम संकटात सापडला असून लातूर जिल्ह्यात परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. सोयाबीनसह विविध खरीप पिकांचे मोठे नुकसान झाले असून पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि सिंचनाचा प्रश्नही गंभीर बनला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लातूर जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीची प्रत्यक्ष पाहणी केली. परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर दोन दिवसांत दुष्काळ जाहीर करण्याबाबत निर्णय घेतला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. धाराशिव जिल्ह्यातील करकखेडा परिसरातील दुष्काळी परिस्थितीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाहणी केली. यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांनी पिकांची आणि पाणीटंचाईची परिस्थिती जाणून घेतली.
यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधताना एका शेतकऱ्याने पावसाअभावी झालेल्या नुकसानाची व्यथा मांडली. परिस्थिती सांगताना त्याला अश्रू अनावर झाले. शेतकरी रडू लागल्यानंतर फडणवीस यांनी त्याला जवळ घेत धीर दिला. त्यानंतर त्याचा हात पकडून ते शेताच्या बांधावरून त्याच्यासोबत चालत गेले.
मुख्यमंत्र्यांनी भेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती, जमिनीतील ओलावा आणि पाण्याची उपलब्धता याची पाहणी केली. शेतकऱ्यांनी पिकांचे नुकसान, पाण्याची टंचाई, जनावरांसाठी चारा आणि वाढत्या कर्जाच्या ताणाबाबत मुख्यमंत्र्यांकडे व्यथा मांडल्या. एका शेतकऱ्याने दोन एकरांवरील सोयाबीन पावसाअभावी वाळून गेल्याचे सांगत पीक घेण्यासाठी घेतलेले कर्ज फेडण्याची चिंता व्यक्त केली. (पान ६ वर)













