तीन महिन्यांत लोकार्पण करण्याचे निर्देश
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कॅम्पसमधील प्रलंबित प्रकल्पांचा आढावा घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिविशेषोपचार दंतचिकित्सा व संशोधन केंद्राचे उर्वरित काम तातडीने पूर्ण करून पुढील तीन महिन्यांत त्याचे लोकार्पण करण्याचे निर्देश दिले आहेत. अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि विविध अतिविशेष दंतचिकित्सा सुविधांनी सुसज्ज होणाऱ्या या केंद्रामुळे विदर्भासह मध्य भारतातील दंत रुग्णांना मोठा लाभ मिळणार असून, दंत शिक्षण व संशोधनालाही नवी दिशा मिळणार आहे.
वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाच्या अधिपत्याखालील शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, नागपूर ही संस्था १९६८ पासून कार्यरत आहे. विदर्भ आणि मध्य भारतातून मोठ्या संख्येने दंत रुग्ण या संस्थेत उपचारासाठी येतात. दररोज किमान ५०० रुग्ण या संस्थेच्या आरोग्यसेवेचा लाभ घेतात. अशा महत्त्वपूर्ण संस्थेत अतिविशेषोपचार सेवा उपलब्ध करून देण्याच्या संकल्पनेतून या केंद्राची उभारणी करण्यात येत आहे.
या महत्त्वाकांक्षी प्रकल्पासाठी सुमारे २२,००२ चौ. फूट जागेचे संपादन करण्यात आले असून, केंद्राचे एकूण बांधकाम क्षेत्रफळ सुमारे ४,७५०.१२ चौ. मीटर आहे. अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असणाऱ्या या प्रकल्पासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, बांधकामाच्या गुणवत्तेसाठी आणि नियोजनासाठी तांत्रिक मान्यताही देण्यात आली आहे. प्रकल्पाचे भूमिपूजन ४ जानेवारी २०१९ रोजी मुख्यमंत्री फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते झाले होते. या केंद्राच्या इमारतीचे ८० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित काम प्रगतीपथावर आहे. विद्युतविषयक कामांसाठी अतिरिक्त निधीची तरतूद करण्यात आली आहे, त्यासाठी १० ऑक्टोबर २०२४ रोजी प्रशासकीय मान्यताही प्राप्त झाली आहे. केंद्राच्या प्रभावी संचालनासाठी शासनाने नवीन पदांना मान्यता दिली असून काही पदांची भरती प्रक्रिया सुरू आहे. एकूण ९१ पदांपैकी ६० पदे भरली गेली आहेत.
शासकीय दंत महाविद्यालय, नागपूर येथे अगोदरच ६३ पदवी पूर्व बीडीएसच्या जागा, २४ पदवी उत्तर एमडीएसच्या जागा आणि शिष्यवृत्ती व पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू असून नॅक ॲ प्लस श्रेणीकरण प्राप्त झालेली संस्था आहे. या नवीन केंद्राच्या माध्यमातून आता, दंतचिकित्सेतील आधुनिक आणि विशेष उपचार सुविधा एकाच छताखाली उपलब्ध होणार आहेत. यामध्ये डिजिटल डेंटिस्ट्री, कॉस्मेटिक डेंटिस्ट्री, ओरल इम्प्लांटॉलॉजी, स्पोर्ट्स डेंटिस्ट्री, क्रेनियोफेशियल सर्जरी आणि फॉरेन्सिक ओडोंटोलॉजी या सहा नवीन विभागांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार उर्वरित कामांना गती देऊन हे केंद्र निर्धारित कालावधीत कार्यान्वित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामुळे विदर्भातीलच नव्हे तर मध्य भारतातील रुग्णांसाठी अत्याधुनिक अतिविशेष दंतचिकित्सा उपचारांचे महत्त्वाचे केंद्र नागपुरात उपलब्ध होणार आहे.
अत्याधुनिक यंत्रसामग्री उपलब्ध
केंद्रात अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा नियोजन समितीअंतर्गत सुमारे ३ कोटी ८९ लाख रुपयांच्या यंत्रसामग्री खरेदीस प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.
तसेच राज्य योजनेअंतर्गत सुमारे ३ कोटी ४३ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून यंत्रसामग्री खरेदीची प्रक्रिया सुरू आहे.













