लोकवाहिनी न्यूज
मुंबई : गोरेगाव पूर्वेतील राम मंदिर परिसरात सार्वजनिक शौचालयात विषारी रासायनिक वायू शिरल्याने दोन तरुणांचा गुदमरून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. शौचालयाच्या शेजारी असलेल्या एका कारखान्यातून रासायनिक सांडपाणी ड्रेनेजमध्ये सोडण्यात आल्याने हा वायू तयार झाल्याची प्राथमिक माहिती आहे. प्रभाकर धनिवर (२४) आणि भाविक देसाई (१८) अशी मृत तरुणांची नावे आहेत.
राम मंदिर रेल्वे स्थानकाजवळील शिवशंकर चाळीत हे सार्वजनिक शौचालय आहे. त्याच्या बाजूलाच रासायनिक पदार्थांचा वापर करणारा एक कारखाना असल्याची माहिती आहे. प्राथमिक माहितीनुसार, या कारखान्यात वापरले जाणारे रसायन सांडपाण्याच्या ड्रेनेजमध्ये सोडण्यात आले, या ड्रेनेजमधून तयार झालेला विषारी वायू शौचालयाच्या पाइपलाइनमध्ये शिरल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शौचालयात गेलेल्या दोन्ही तरुणांचा गुदमरून मृत्यू झाला. शुक्रवारी उशिरा गोरेगाव राम मंदिर परिसरातील साई कृपा मित्र मंडळाच्या गणपतीचे पवई येथे विसर्जन करण्यात आले. विसर्जननंतर मंडळाचे कार्यकर्ते पुन्हा मंडपात परतले, सर्वांनी एकत्र जेवण केले, त्यानंतर भाविक देसाई आणि प्रभाकर धनिवर हे दोघे सार्वजनिक शौचालयात गेले, मात्र, बराच वेळ होऊनही ते परतले नाहीत.
सुमारे अर्धा तास दोघे बाहेर न आल्याने मंडळातील काही कार्यकर्त्यांनी शौचालयात जाऊन पाहिले, त्यावेळी परिसरात तीव्र रासायनिक दुर्गंधी पसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. दोन्ही तरुण शौचालयात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. कार्यकर्त्यांनी तातडीने पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी दोघांना जोगेश्वरी ट्रॉमा केअर रुग्णालयात दाखल केले, मात्र, डॉक्टरांनी तपासणीनंतर दोघांनाही मृत घोषित केले. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. गणेश विसर्जननंतर काही वेळातच दोन तरुणांचा अशाप्रकारे मृत्यू झाल्याने स्थानिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. कारखान्यातून रासायनिक पदार्थांची गळती झाली का, तसेच ते सांडपाण्याच्या ड्रेनेजमध्ये सोडण्यात आले का, याचा तपास सुरू आहे. घटनेची माहिती मिळाल्यानंतर खासदार रवींद्र वायकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. तसेच मुंबईतील अनधिकृत रासायनिक कारखान्यांवर कारवाई करावी आणि अशा कारखान्यांना परवानगी किंवा संरक्षण देणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, या प्रकरणी वनराई पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. कारखान्यातील रसायनांमुळेच विषारी वायू तयार झाला का, याचा तपास केला जात आहे. मृतदेहांचे शवविच्छेदन करण्यात येत असून, त्याच्या अहवालानंतर मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होण्याची शक्यता आहे. संबंधित व्यक्तींविरोधात कायदेशीर कारवाई सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे सार्वजनिक ठिकाणांच्या आसपास रासायनिक कारखाने आणि त्यांच्याकडून सोडण्यात येणाऱ्या सांडपाण्याच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाकडून संबंधित कारखान्यांची तपासणी आणि आवश्यक कारवाई केली जाणार का, याकडे स्थानिकांचे लक्ष लागले आहे.














