उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. भाजपकडून उमेदवार कोण, याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही दिवस शिल्लक असताना माजी आमदार प्रा. अनिल सोले आणि सुधाकर कोहळे यांच्या नावांची जोरदार चर्चा सुरू आहे. भाजपने अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केलेला नसल्याने अखेरच्या क्षणी कोणाच्या नावावर शिक्कामोर्तब होते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
भाजपांमधील अंतर्गत समीकरणांमध्ये प्रा. अनिल सोले यांचे नाव केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गटाशी जोडले आहे. सुधाकर कोहळे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची पसंती आहे, त्यामुळे अंतिम क्षणी कोणता निर्णय होतो, हे रंजक ठरणार आहे.
यापूर्वी २०२० च्या निवडणुकीत भाजपने तत्कालीन विद्यमान आमदार प्रा. अनिल सोले यांच्याऐवजी संदीप जोशी यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे अभिजीत वंजारी यांनी जोशी यांचा १८ हजार ९१० मतांनी पराभव करत ५८ वर्षांपासून असलेले भाजपचे वर्चस्व संपुष्टात आणले. त्यामुळे यंदा उमेदवार निवडताना पक्षांतर्गत मतभेद टाळण्यावर भाजपचा पूर्ण भर आहे.
नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघात नागपूर, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या सहा जिल्ह्यांचा समावेश आहे. यापूर्वी जानेवारी २०२६ मध्ये प्रसिद्ध झालेल्या अंतिम मतदार यादीत १ लाख ५९ हजार ९२५ मतदार होते; त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होईपर्यंत पूरक नोंदणी सुरू ठेवण्यात आली होती. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीतील अंतिम मतदारसंख्या मागील यादीपेक्षा वाढणार आहे.
सावधगिरीमुळे विलंब
काँग्रेसने विद्यमान आमदार अभिजीत वंजारी यांचे नाव आधीच निश्चित केले. अशात भाजपकडून उमेदवार जाहीर होण्यास होत असलेला विलंब अधिक चर्चेचा विषय ठरला आहे. विशेष म्हणजे यंदा मतदारसंख्या वाढलेली असल्याने उमेदवाराची वैयक्तिक पकड, सहा जिल्ह्यांतील संघटनात्मक जाळे, मतदार नोंदणी आणि पक्षांतर्गत एकजूट हे निवडणूक प्रचारातील महत्वाचे घटक ठरणार आहेत. भाजपसमोर सोले की कोहळे, हा प्रश्न असला तरी अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठींच्या बैठकीतच होणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत जवळ आल्याने पुढील काही दिवसांत नागपूरच्या भाजपच्या राजकारणातील ही चुरस निर्णायक टप्प्यावर पोहोचली आहे.













