आजच्या तरुणांची मानसिकता, स्वतःची ओळख शोधण्याचा प्रवास आणि घराशी असलेले नाते मांडणारा ‘मॅगझिन’ हा मराठी चित्रपट २३ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या संगीतासाठी संगीतकार सलिल कुलकर्णी आणि गीतकार संदीप खरे अनेक वर्षांनंतर पुन्हा एकत्र आले आहेत.
शुभम संजय शेबडे यांनी या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन केले आहे. शहरात वाढलेल्या आणि चित्रपटांची आवड असलेल्या एका तरुणाची ही कथा आहे. तो महाराष्ट्रातील असलेल्या मूळ गावी जातो. तिथे आलेल्या काही अनपेक्षित अनुभवांमुळे त्याचा स्वतःकडे, बाजूच्या जगाकडे आणि घराकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलतो. ‘चल जाऊ पुन्हा परतून घरा रे’ हे गाणे या चित्रपटातील महत्त्वाचे आकर्षण आहे. सलिल कुलकर्णी यांचे संगीत, संदीप खरे यांचे शब्द आणि शुभंकर कुलकर्णी यांचा आवाज यामुळे गाण्याला वेगळी रंगत आली आहे. चित्रपटाचे पार्श्वसंगीत उत्तराखंडचे संगीतकार विलक्षण कंवडवाल यांनी तयार केले आहे. चित्रपटातील मूळ संगीत स्वतंत्रपणेही प्रेक्षकांसाठी उपलब्ध होणार आहे.
विशेष म्हणजे, कोणत्याही मोठ्या स्टुडिओच्या मदतीशिवाय या चित्रपटाची निर्मिती करण्यात आली आहे. शुभम शेबडे यांनी पत्नी अपर्णा कुलकर्णी आणि अमृत कुलकर्णी यांच्यासोबत चित्रपटाची निर्मिती केली आहे. चित्रपटाचे बहुतांश चित्रीकरण अपर्णा कुलकर्णी यांच्या मूळ गावी दत्तवाड येथे झाले, चित्रपटाची टीम अनेक महिने गावात राहून काम करत होती. या चित्रपटात राघव वर्तक, डॉ. निलेश माने, सुदर्शन देशमुख आणि वेधिका कुलकर्णी हे नवे कलाकार दिसणार आहेत. त्यांच्यासोबत अतुल परचुरे, शिवानी साटम आणि किशोर कदम यांसारखे अनुभवी कलाकारही आहेत. शुभम शेबडे यांनी अमेरिकेत चित्रपट निर्मितीचे शिक्षण घेतले असून, लॉस एंजेलिसमध्येही काम केले आहे. त्यांच्या ‘मॅगझिन’ चित्रपटाचा समावेश २०२६ साठी फिप्रेसी-इंडियाने निवडलेल्या समकालीन भारतीय चित्रपटांच्या यादीत झाला आहे. चित्रपटाचा ट्रेलर ऑनलाइन प्रदर्शित झाला असून, ग्रामीण महाराष्ट्राकडे एका तरुणाच्या नजरेतून पाहण्याची संधी त्यातून मिळते. ‘मॅगझिन’ २३ ऑक्टोबर रोजी केवळ सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.













