पड्यामागे जोरदार हालचाली
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील चित्र स्पष्ट असून ३८ उमेदवार रिंगणात आहेत. या निवडणुकीत मतदारांना मतदान पसंतीक्रमानुसार करता येणार असल्याने पहिल्यासोबत दुसऱ्या, तिसऱ्या क्रमांकाचे मतेही महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत. त्यामुळे पहिल्या पसंतीची मते मिळविण्यासाठी प्रचाराची धावपळ सुरू असतानाच दुसऱ्या पसंतीच्या मतांची जुळवाजुळव करण्यासाठी पडद्यामागे जोरदार हालचाली सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
निवडणुकीचे चित्र स्पष्ट होताच उमेदवारांनी प्रचाराचा वेग वाढविला आहे. नागपूर विभागातील सहाही जिल्ह्यांमध्ये मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी उमेदवार, त्यांचे समर्थक आणि राजकीय नेते सक्रिय झाले आहेत. सुमारे २.५३ लाख मतदारांची नोंदणी झालेल्या या निवडणुकीत प्रत्येक मताला महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे प्रतिस्पर्धी उमेदवारांशी संभाव्य समन्वय, नेत्यांशी चर्चा आणि प्रभावशाळी मतदारांशी संपर्क साधण्यावर भर दिला जात असल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे, पहिल्या पसंतीच्या मतांमध्ये आघाडी मिळाली तरी विजयाची खात्री नसल्याने उमेदवारांचे लक्ष मतांच्या पुढील पसंतीक्रमाकडे बळले आहे.
पहिल्या पसंतीच्या मतमोजणीत कोणत्याही उमेदवाराला आवश्यक कोटा गाठता न आल्यास पुढील पसंतीच्या मतांची मोजणी निर्णायक ठरू शकते. त्यामुळे दुसऱ्या पसंतीची मते कोणाच्या पारड्यात पडतात, यावर विजयाचे गणित अवलंबून राहू शकते.
गणित जुळवण्यासाठी कसोटी
पहिल्या पसंतीत स्पष्ट बहुमत मिळविणे आस्मानात्मक ठरल्यास दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक भूमिका बजावू शकतात. त्यामुळे उमेदवारांसाठी प्रत्येक मतदार महत्त्वाचा ठरत असून प्रचारासोबतच मतांचे गणित जुळविण्याची कसोटी लागणार आहे. अखेर मतदारांचा कौल कोणाला मिळतो आणि दुसऱ्या पसंतीची मते कोणाच्या विजयाचा मार्ग मोकळा करतात, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
दुसऱ्या पसंतीची मते मिळविण्यासाठी उमेदवारांकडून संभाव्य मतविभाजनाचा अंदाज घेतला जात आहे. कोणत्या उमेदवाराला पहिल्या पसंतीची मते मिळू शकतात आणि कोणाकडून दुसऱ्या पसंतीची मते मिळण्याची शक्यता आहे, याची गणिते मांडली जात आहेत. काही ठिकाणी परस्पर समन्वयाच्या शक्यतेवर चर्चा होत असल्याचीही राजकीय वर्तुळात चर्चा आहे.













