डिपॉझिटचा नवा बोजा
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन कोलमडल्याने ऐन नवरात्रोत्सवात नागपूरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अमृत योजनेच्या कामासाठी नियोजित ३६ तासांचा शटडाऊन तब्बल ७२ तासांपर्यंत लांबला. त्यानंतर मानकापूर परिसरातील जलवाहिनीच्या गळतीच्य दुरुस्तीसाठी पुन्हा २४ तासांचा शटडाऊन घेण्यात आला.
पाणी पुरवठ्यात सलग व्यत्ययांमुळे शहरातील अनेक भागांत टंचाईचे संकट निर्माण झाले आहे. नळाला पाणी नाही आणि पर्याय म्हणून वॉटर कॅनवर अवलंबून राहण्याची वेळ नागपूरकरांवर आली आहे. मात्र, वाढलेल्या मागणीचा फटका आता थेट नागरिकांच्या खिशाला बसत आहे. पूर्वी ४० ते ५० रुपयांना मिळणारी पाण्याची कॅन आता तुटवड्यामुळे १०० रुपयांना विकली जात असल्याची स्थिती आहे.
नवीन ग्राहकांना कॅन घेण्यासाठी ५०० ते एक हजार रुपयांपर्यंत डिपॉझिटही द्यावे लागत आहे. कॅन मिळविण्यासाठी पैसे मोजूनही नागरिकांची सुटका होत नाही. पूर्वी रिकामी कॅन २४ तासांत परत करण्याची मुभा असताना आता काही विक्रेत्यांकडून ती अवघ्या १२ तासांत परत मागितली जात आहे. त्यामुळे घरगुती वापर, लहान मुलांची गरज आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करणेही कठीण झाले आहे.
पाणीसंकट किती गंभीर?
नागपूर महापालिकेकडून यंदा उन्हाळ्यात दररोज सुमारे ७६५ दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असल्याची नोंद.
एकूण पाणी ग्राहकांची फेब्रुवारी २०२६ मधील नोंद ४ लाख ५२ हजार ३५ आहे.
केवळ १० हजार ९५४ ग्राहकांना २४ तास पाणी मिळत आहे.
गळतीमुळे दररोज सुमारे २५५ दशलक्ष लिटर पाणी वाहून जाते किंवा चोरी होते.
संत्रानगरीची अशी भागते तहान
पेंच प्रकल्प : ५२० दशलक्ष लिटर
कन्हान : २२० दशलक्ष लिटर
नळजोडण्या : ४.५० लाख
प्रस्तावित पाणी कपात : ७५ दशलक्ष लिटर दररोज
नियोजनाचा पूर्णतः अभाव
शहराला दररोज शेकडो दशलक्ष लिटर पाणीपुरवठा होत असतानाही जलवाहिनीतील बिघाड आणि दुरुस्तीच्या कामांमुळे नागरिकांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत. वॉटर कॅनच्या किमतीत झालेली वाढ, डिपॉझिटची रक्कम आणि रिकामी कॅन परत करण्यासाठी कमी केलेली मुदत यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा कोणती, असा प्रश्नही उपस्थित होत आहे













