अभिजित दीपके यांचे दिल्ली पोलिसांवर आरोप
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : दिल्लीतील आंदोलनादरम्यान ताब्यात घेतल्यानंतर आपल्याला कुटुंबीय आणि वकिलांशी संपर्क साधू दिला नाही. गावात राहणाऱ्या भावाशी दोन मिनिटे बोलू द्या, अशी वारंवार विनंती करूनही पोलिसांनी फोन करू दिला नाही. आधीच आजीचे निधन झाले असताना आपल्याला कुटुंबीयांशी बोलू न दिल्याने मानसिक त्रास सहन करावा लागला. पहाटे साडेतीन वाजता आई-वडिलांना फोन करून अटकेची माहिती देण्यास सांगितले जात होते, असा आरोप कॉँग्रेच जनता पार्टीचे अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलिसांवर आज येथे बोलताना केला.
दिल्लीतील आंदोलनातून ते आजीच्या निधनानंतर हिंगोली जिल्ह्यातील संतुक पिपरी या गावी जात असताना नागपूर विमानतळावर उतरले होते. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना दिल्ली पोलिसांच्या कारवाईवरून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात हुकूमशाही सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला. ती संपवण्यासाठी पुन्हा रस्त्यावर उतरावे लागेल. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना वाचवण्यासाठी दिल्लीतील रस्ते, मेट्रो आणि रेल्वे सेवा बंद करण्यात आल्याचा दावाही त्यांनी केला.
दिल्लीतील आंदोलनादरम्यान महिला आणि तरुणींना मारहाण झाल्याचा आरोप करत अभिजित दीपके यांनी दिल्ली पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आंदोलकांवर कारवाई केल्याचा आरोप असलेल्या पोलीस अधिकाऱ्याला पदोन्नती देण्यात आली. देशात गुन्हेगारांना प्रोत्साहन दिले जात आहे. पोलिसांनी कोणाच्या दबावाखाली कारवाई करायची, याचा विचार करण्याची गरज आहे. महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपला विश्वास असून, अशा कारवाईमुळे आपण आंदोलनापासून मागे हटणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.












