समृद्धी, मुंबई-पुणे, मुंबई-गोवा महामार्गांचा समावेश
मंत्री सरनाईक यांची माहिती
लोकवाहिनी न्यूज
मुंबई : राज्यातील महामार्गांवरील होणाऱ्या गंभीर अपघातातील जखमींना तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत, यासाठी नवीन वर्षाच्या सुरवातीला ‘हवाई रुग्णवाहिका’ सेवा सुरू करण्याचे नियोजन राज्य सरकारने केले आहे. समृद्धी महामार्ग, मुंबई-पुणे द्रुतगती महामार्ग आणि मुंबई-गोवा महामार्गावर ही विशेष यंत्रणा उभारण्यास प्राधान्य दिले जाणार आहे, अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली.
अपघात झाल्यानंतरचा पहिला तास जखमी व्यक्तीचा जीवन वाचवण्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळाला वैद्यकीय भाषेत ‘गोल्डन अवर’ म्हटले जाते. या वेळेत योग्य उपचार मिळाल्यास जखमींचे प्राणा वाचण्याची शक्यता वाढते. मात्र, महामार्गांवरील वाहतूक कोंडी, रुग्णालयाचे अंतर आणि आपत्कालीन सुविधांचा अभाव यामुळे अनेकदा उपचार मिळण्यास विलंब होतो. ही अडचण दूर करण्यासाठी हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्याचा विचार आहे. या योजनेच्या नियोजनासाठी आयोजित बैठकीत सरनाईक बोलत होते. या बैठकीला आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, गृहराज्यमंत्री योगेश कदम, परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर, आरोग्य विभागाचे संचालक संजय काटकर, वाहतूक पोलिस विभागाचे अधीक्षक डॉ. सुनील भारद्वाज यांच्यासह परिवहन, आरोग्य आणि पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हवाई रुग्णवाहिका सेवा सुरू करण्यासाठी १५ नोव्हेंबरपर्यंत प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करून मंजुरी घेण्याचे नियोजन आहे. त्यानंतर नोव्हेंबरअखेर उच्चाधिकार समितीची मंजुरी घेऊन निविदा प्रक्रिया राबवण्यात येणार आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नवीन वर्षाच्या सुरवातीला सेवा सुरू करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. राज्यात दरवर्षी सुमारे १५ हजार रस्ते अपघात होत असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे अपघातानंतर जखमींना वेळेत रुग्णालयात पोहोचविणे आणि योग्य उपचार उपलब्ध करून देणे महत्त्वाचे ठरणार आहे.
समृद्धी, मुंबई-पुणे आणि मुंबई-गोवा महामार्गावर हवाई रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यासह जखमींना ट्रमा केअर सेंटरपर्यंत पोहोचविण्याची व्यवस्था केली जाणार आहे. यासाठी सेवा पुरवठादारांचे पॅनेल तयार करणे, ट्रमा केअर सेंटर निश्चित करणे आणि रस्ता सुरक्षा निधीतून आवश्यक आर्थिक तरतूद करण्यावर भर दिला जाणार आहे. या सेवेसाठी परिवहन, आरोग्य आणि पोलिस विभागांमध्ये समन्वय ठेवून आपत्कालीन मदतीची कार्यपद्धती निश्चित केली जाईल. ‘अपघात रोखणे महत्त्वाचे आहे; मात्र अपघातानंतर उपचार मिळाल्यास झालेल्या विलंबामुळे कोणाचाही जीव जाऊ नये, यासाठी सक्षम यंत्रणा उभारणे आवश्यक आहे, प्रत्येक जीव अनमोल असून, जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे,’ असे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले.













