राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आल्याची चर्चा
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : रामटेकचे काँग्रेस खासदार श्यामकुमार बर्वे यांनी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या गालावर हलकी चापट मारल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे. बसमधील या प्रसंगावरून उलटसुलट प्रतिक्रिया उमटत असतानाच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांकडे तक्रार करण्यात आल्याची चर्चाही सुरू झाल्या आहेत. मात्र, बर्वे आणि धानोरकर या दोघांनीही हा प्रसंग केवळ थट्टामस्करीचा असल्याचे सांगत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ नोव्हेंबर रोजी दिल्लीतील रामलीला मैदानावर काँग्रेस आणि इंडिया आघाडीतर्फे आयोजित मोर्चासाठी अनेक खासदार बसने जात होते. यावेळी प्रतिभा धानोरकर आणि खासदार वर्षा गायकवाड बसमध्ये एकत्र बसल्या होत्या. श्यामकुमार बर्वे त्यांच्या जवळ उभे होते. गप्पा आणि हास्यविनोद सुरू असताना बर्वे यांनी धानोरकर यांच्या उजव्या गालावर हलकेच चापट मारल्याचा प्रसंग बसमधील एका व्यक्तीने चित्रित केला. हाच व्हिडिओ आता समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरला आहे.
या प्रकरणावर स्पष्टीकरण देताना खासदार श्यामकुमार बर्वे यांनी प्रतिभा धानोरकर या आपल्यासाठी लहान बहिणीसारख्या असल्याचे सांगितले. त्यांच्यात नेहमीप्रमाणे विनोद सुरू होता. त्याचाच हा भाग असल्याचा दावा त्यांनी केला. विरोधक या व्हिडिओचा वापर करून काँग्रेसची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
धानोरकर यांनीही बर्वे हे आपले भाऊ असल्याचे सांगत या प्रसंगाला विनोदाची पार्श्वभूमी असल्याचे स्पष्ट केले. बसमध्ये बर्वे यांच्या लग्नावरून गंमत सुरू होती. त्यावेळी त्यांनी आपला मुलगा २१-२२ वर्षाचा असल्याचे सांगितले. त्याच संभाषणदरम्यान बर्वे यांनी आपल्याला आणि वर्षा गायकवाड यांना प्रेमाने गालावर स्पर्श केला. त्यामुळे या विषयावर विनाकारण चर्चा करू नये, असे धानोरकर यांनी म्हटले आहे.
दरम्यान, व्हिडिओ वायरल झाल्यानंतर काँग्रेसमधील काही कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त आहे. या प्रकरणी पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्याकडे तक्रार करण्यात आल्याचीही चर्चा आहे. आता या व्हिडिओवरून राजकीय वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
















