पुणे : उसाला प्रतिटन पहिली उचल ४ हजार ५०० रुपये आणि अंतिम दरापोटी आणखी ५०० रुपये मिळावेत, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चक्काजाम आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा बुधवाररी दुसरा दिवस होता. पुणे-बंगळुरू महामार्ग २२ तासांपासून बंद असल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाला असून, वाहनांच्या लांब लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, मागण्यांवर तोडगा न निघाल्यास मुंबईला होणारा भाजीपाला आणि दुधाचा पुरवठा रोखण्यात येईल, असा इशारा राजू शेट्टी यांनी दिला आहे.
ऊस उत्पादकांना प्रतिटन ४ हजार ५०० रुपयांचा पहिला हप्ता द्यावा, अशी संघटनेची प्रमुख मागणी आहे. त्यासाठी आंदोलनाच्या दुसऱ्या दिवशीही कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. नागाठाणे गावाजवळ आंदोलकांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग अडवला आहे. या आंदोलनामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या असून, अनेक वाहनचालक अडकून पडले आहेत. काही ट्रकचालकांनी आंदोलकांकडून मारहाण झाल्याचा आरोप केला आहे. कोल्हापूरमधील किनी टोल नाक्यावर राजू शेट्टी यांनी धरणे आंदोलन सुरू केले आहे. कोल्हापूरमधील आंदोलनावर तोडगा निघत नाही आणि राजू शेट्टी यांचा पुढील आदेश मिळत नाही, तोपर्यंत महामार्गावरून हटणार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक कधी सुरळीत होणार, याबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे.
दरम्याने, स्वाभिमानी किसान संघटनेचे महाराष्ट्र राज्य कार्यकारी अध्यक्ष अनिल पवार यांनी सरकार आणि साखर कारखानदारांच्या भूमिकेवर नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने साखरेची किमान आधारभूत किंमत ५० रुपयांनी वाढवावी, तसेच इथेनॉलचा दर १२ रुपयांनी वाढवून प्रतिलिटर ७० रुपये करावा, अशी मागणी त्यांनी केली. राज्य सहकारी बँकेने साखरेचा दर प्रतिक्विंटल ४ हजार २०० रुपये निश्चित केला आहे, असे असताना सर्व पक्षंशी संबंधित साखर कारखानदार शेतकऱ्यांना पहिला हप्ता देण्यास विलंब करत असल्याचा आरोप त्यांनी केला. राजू शेट्टी यांनी आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशारा दिला आहे. शेतकऱ्यांच्या मागण्यांवर तोडगा न निघाल्यास मुंबईला होणारा भाजीपाला आणि दुधाचा पुरवठाही बंद करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे मुंबईतील भाजीपाला आणि दूध पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता आहे. ऊस उत्पादकांच्या मागण्यांवर सरकार आणि साखर कारखानदार काय निर्णय घेतात, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
स्वाभिमानीचा फायनान्स कंपनीला दटका
अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यातील निबोरा बोडखा येथे स्वाभिमानी किसान संघटनेने फायनान्स कंपनीविरोधात आंदोलन केले. कंपनीने कांबळे कुटुंबाचे घर सील करून रवी कांबळे आणि राजकुमार कांबळे यांना घरात प्रवेश करण्यास मज्जाव केल्याचा आरोप आहे. या प्रकाराची माहिती मिळताच संघटनेचे कपिल पाडघन यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्ते घटनास्थळी पोहोचले. त्यांनी आंदोलन करत हातोड्याच्या साहाय्याने घरचे सील तोडले. या कार्रवाईमुळे परिसरात चर्चा सुरू झाली असून, फायनान्स कंपनीच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित केले जात आहेत.















