महापौरांच्या हस्ते पूजा व्यवस्था कार्यचे भूमिपूजन
लोकवाहिनी न्यूज
नागपूर : उत्तर भारतीयियांच्या श्रद्धेचा धार्मिक उत्सव छठ पूजा नागपुरात हर्षोल्लासात साजरा केला जातो. अंबाझरी तलाव घाटावर मोठ्या संख्येत भाविक सूर्यदेवाला अर्ध्य अर्पण करतात. या उत्सवात सहभागी होणाऱ्या भाविकांसाठी देण्यात येणाऱ्या सोयी सुविधा आणि व्यवस्था कार्यचे भूमिपूजन महापौर नंदा ठाकरे यांच्या हस्ते आज करण्यात आले.
याप्रसंगी उपमहापौर लीला हाथीबेड़, माजी महापौर दयाशंकर तिवारी, धरमपेठ झोन सभापती धनश्री देशपांडे, नगरसेवक अभिजीत झा, उपायुक्त राजेश भगत, सहायक आयुक्त राजकुमार मेश्राम, कार्यकारी अभियंता मनोज गद्रे, मुख्य स्वच्छता अधिकारी डॉ. गजेंद्र महल्ले यांच्यासह इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना महापौर ठाकरे म्हणाल्या, छठ व्रत पूजेमध्ये केवळ उत्तर भारतीय नागरिकच नव्हे तर नागपुरातील नागरिक आस्थेने सहभागी होतात. हा धार्मिक सण एकात्मतेचे दर्शन घडविणारा उत्सव ठरत आहे. अर्ध्य अर्पण करण्यासाठी अंबाझरी तलावावर येणाऱ्या भाविकांची संख्या दरवर्षी वाढत आहे. भाविकांना अडथळा होणार नाही, याची पूर्ण काळजी नागपूर महानगरपालिका प्रशासन घेईल, भाविकांना उपलब्ध करून देण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांसोबतच भाविकांच्या सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात येईल. तसे निर्देश प्रशासनाला देण्यात आले आहे.
छठ पूजेच्या दिवशी पहाटे तलावावर भाविकांची गर्दी होणार असल्यामुळे आवश्यक ती प्रकाशव्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती महापौर यांनी दिली. छठ पूजेच्या निमित्ताने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने अंबाझरी, फुटाळा आणि गोरेवाडा तलाव येथे सुरक्षेच्या दृष्टीने बॅरिकेडिंग, संपूर्ण परिसरात विद्युत व्यवस्था सार्वजनिक सूचना देण्यासाठी ध्वनिक्षेपक यंत्रणा, स्वागत कक्ष, श्रद्धाळूंना पूजा व्यवस्थेसाठी सुरक्षित घाटांचे अस्थायी निर्माण आदी व्यवस्था महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येणार आहे. छठ पूजा पर्वाच्या व्यवस्थापनाच्या दृष्टीने महानगरपालिका निधीचे नियोजन करते. कुठल्याही प्रकारची दुर्घटना होऊ नये यासाठी अग्निशमन विभागाची आपातकालिन यंत्रणा तत्पर राहील, मनपाच्या आरोग्य विभागाच्या वतीने रुग्णवाहिकेचीही व्यवस्था करण्यात आली आहे.














